बेकायदा पार्किंग, रिक्षा थांबे यांमुळे ठाण्यातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी

ठाणे : वाढलेली वाहन संख्या, मेट्रोची सुरू असलेली कामे आणि खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली असताना आता शहरातील रस्त्यांकडेला बेकायदा वाहने उभी राहू लागली आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसोबत अंतर्गत मार्गही वाहतूक कोंडीत अडकू लागले आहेत. तसेच विविध रस्त्यांवर रिक्षाचालकांनी बेकायदा थांबे सुरू केले आहेत. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते आता अरुंद होत आहेत.

ठाणे शहरात वाहनांची संख्या वाढू लागली आहे. मात्र अपुरे रस्ते आणि वाहनतळांची अपुरी सोय यामुळे शहरात दररोज वाहतूक कोंडी होत असते. करोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरातील शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्याने शहरातील घोडबंदर, वर्तकनगर, वागळे इस्टेट भागांत मोठ्या प्रमाणात शाळांच्या बसगाड्या उभ्या राहू लागल्या आहेत. घोडबंदर येथील ब्रह्मांड, कोलशेत, कापूरबावडी येथील सेवा तसेच मुख्य मार्गावर या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर पोखरण रोड एक-दोन, वर्तकनगर, उपवन, शास्त्रीनगर, शिवाईनगर, देवदया नगर, वसंत विहार, म्हाडा कॉलनी या ठिकाणीही बसगाड्या उभ्या असतात. या गाड्यांवर कोणतीही कारवाई पोलिसांकडून होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी टीएमटी बस थांब्याच्या समोरच या बस उभ्या केलेल्या पाहायला मिळत आहेत. तर, अनेकांनी त्यांचे टेम्पोही उभे केल्याने अर्धा रस्ता हे टम्पो व्यापत आहेत.

टेम्पो आणि बसगाड्यांप्रमाणे शहरातील रस्ते रिक्षाचालकांनी अडवण्यास सुरुवात केली आहे. शहरातील यशोधन नगर, कामगार नाका, ज्ञानेश्वर नगर, वर्तकनगर, देवदया नगर, वसंत विहार, माजीवडा चौक या ठिकाणी अनधिकृत रिक्षा थांबे झालेले दिसत आहेत. माजीवडा चौकातील अनधिकृत रिक्षा थांबा हा मेट्रोच्या मार्गरोधकासमोरच आहे. त्यामुळे ठाण्याहून घोडबंदर किंवा माजीवड्याच्या दिशेने जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीत अडकावे लागत आहे.  यामुळे अपघाताची शक्यताही निर्माण झालेली आहे.

टोइंगची कारवाई बंद

टाळेबंदी शिथिलीकरणाच्या पाचव्या टप्प्यात ठाणे शहरातील दुकाने, खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून सार्वजनिक वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र, शहरातील वाहतूक पोलिसांतर्फे टोइंगची कारवाई अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे बेशिस्त पार्किंगची समस्या वाढू लागली आहे. शहरातील रेल्वे स्थानक परिसर, जांभळी नाका, जवाहरबाग स्मशानभूमी परिसर, इंदिरानगर नाका, वागळे इस्टेट, बाळकुम नाका या भागांमध्ये वाहनचालक अवैधरीत्या वाहने पार्क करत आहेत. बेशिस्त पार्किंगमुळे सकाळ आणि सायंकाळच्या वेळी शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिकची भर पडत आहे. रेल्वे स्थानक आणि जांभळी नाका या गर्दीच्या भागांमध्ये बेशिस्त पार्किंग वाढत असल्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास अडथळा निर्माण होत आहे.

ठाणे शहरात अनधिकृतरीत्या उभ्या असलेल्या वाहनांवर तसेच बेकायदेशीर उभ्या असलेल्या रिक्षांवर कारवाई सुरूच असते. शाळा बंद असल्यामुळे खासगी बसगाड्या उभ्या असतील, तर नागरिकांच्या तक्रारीनुसार तिथेही कारवाई केली जाते.

– अमित काळे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे पोलीस