News Flash

अवैध प्रवासी वाहतूक बेधडक सुरूच!

शहरातील खासगी बसवाहतूक अद्याप बंद झालेली नाही.

अवैध प्रवासी वाहतूक बेधडक सुरूच!

आरटीओ, टीएमटीच्या वादात खासगी बसचालकांचा लाभ

ठाणे पूर्व स्थानक ते कासारवडवली या मार्गावर विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ांविरोधात कारवाई करण्याच्या मुद्दय़ावरून ठाणे महापालिका परिवहन (टीएमटी) व्यवस्थापन आणि ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभागामध्ये (आरटीओ) जुंपली आहे. आरटीओकडे सातत्याने पत्र व्यवहार करूनही कारवाई केली जात नसल्याचे टीएमटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर आरटीओने जप्त केलेल्या खासगी बसगाडय़ा ठेवण्यासाठी टीएमटीकडून जागा दिली जात नसल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोन्ही यंत्रणांच्या वादात खासगी बसमालकांचे मात्र फावले असून आजही ठाण्यात मोठय़ा प्रमाणात खासगी बसमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे.

ठाणे पूर्व स्थानक ते कासारवडवली या मार्गावर गेल्या काही वर्षांपासून खासगी बसगाडय़ांमधून विनापरवाना प्रवासी वाहतूक केली जाते. या बसगाडय़ांमुळे टीएमटीच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा दावा करत त्याविरोधात कारवाई करण्याची मागणी परिवहन समिती सदस्यांनी काही महिन्यांपूर्वी बैठकीत केली होती. त्यावेळेस ठाणे उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस या दोन्ही विभागांची मदत घेऊन खासगी बसगाडय़ांविरोधात संयुक्तपणे कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन परिवहन प्रशासनाने दिले होते. त्यानंतरही शहरातील खासगी बसवाहतूक अद्याप बंद झालेली नाही.

परिवहन समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत हाच मुद्दा चर्चेत आला असताना समितीचे सदस्य सचिन शिंदे यांनी प्रशासनाकडे कारवाईबाबत विचारणा केली. शहरात विनापरवाना सुमारे दोनशे खासगी बसगाडय़ा प्रवासी वाहतूक सुरूअसल्याचे स्पष्ट होत आहे. या बसगाडय़ांमुळे टीएमटीच्या उत्पन्नावर परिणाम होत असून या बसगाडय़ांवर कारवाई केव्हा होणार, असा सवाल त्यांनी केला. राजेंद्र महाडिक, प्रकाश पायरे यांनीही या मुद्दय़ावर प्रशासनाला घेरले. त्यावेळी टीएमटीचे व्यवस्थापक संदीप माळवी यांनी कारवाई होत नसल्याबद्दल प्रादेशिक परिवहन विभागाकडे बोट दाखवले. ‘शहरात विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाडय़ांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार परिवहन प्रशासनाला नाहीत. त्यामुळे या कारवाईसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडे सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येतो, पंरतु त्याची दखल या विभागाकडून घेतली जात नाही,’ असे माळवी यांनी सांगितले.

टीएमटीच्या या आरोपांबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी हा टीएमटीचा दोष असल्याचे म्हटले. ‘विनापरवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाडय़ांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये जप्त केलेल्या बसगाडय़ा ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे जागा मिळण्यासाठी टीएमटी प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला जात आहे. मात्र या पत्राची टीएमटीकडून दखल घेण्यात आलेली नाही,’ असे ठाणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी स्पष्ट केले.

आता जांभळीनाकामार्गे वाहतूक

ठाणे पूर्व स्थानक ते कासारवडवली या मार्गावर खासगी बसवाहतूक सुरू आहे. ठाणे पूर्व भागातील नागरिकांच्या विरोधानंतर पश्चिमेतील राम मारुती रोड भागातून ही वाहतूक सुरू झाली होती. त्यानंतर आता जांभळीनाकामार्गेही वाहतूक सुरू झाली आहे, अशी माहिती सचिन शिंदे यांनी बैठकीत दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 11, 2017 1:44 am

Web Title: illegal passenger transport by private buses in thane west
Next Stories
1 ठाण्याच्या वेशीवर शिलाहारकालीन अवशेष
2 पादचाऱ्यांचा मार्ग ‘ब्लॉक’
3 खाऊखुशाल : चवीचे पाश्चिमात्य ढंग
Just Now!
X