वाहतूक पोलिसांचा खासगी बस सेवा बंदचा दावा फोल

ठाण्यातून खासगी बस गाडय़ांची वाहतूक शंभर टक्के  बंद करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी महिन्याभरापूर्वी दिली होती. मात्र, खासगी बस चालकांचे वाहतूक पोलिसांसोबत असलेल्या ‘अर्थ’पूर्ण’ बांधिलकीमुळे पालवे यांनी केलेल्या या दाव्याला वाहतूक पोलिसांकडूनच हरताळ फासला जात आहे. विशेष म्हणजे, ठाण्याच्या तीन हात नाका परिसरातील वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयापासून हाकेच्या अंतराहूनच या बसगाडय़ा चालविल्या जात आहेत. मात्र, त्याकडे वाहतूक पोलिसांचा कानाडोळा होताना दिसत आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे आणि कोपरी संघर्ष समिती यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच वाहतूक शाखेच्या कार्यालयात बैठक झाली होती. या बैठकीत पालवे यांनी ठाण्यामध्ये खासगी बस गाडय़ांची वाहतूक पूर्णपणे बंद होईल. फक्त कंपनी बस चालकांकडे रितसर परवानगी असल्याने फक्त त्याच बस गाडय़ा धावू शकतील असे सांगितले होते. त्यानंतर काही दिवस कोपरी येथे कारवाया करण्यात आल्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून बाराबंगला येथून कारवाया बंद झाल्या असून खासगी बस गाडय़ांचा पुन्हा सुळसुळाट झाल्याचे दिसून येत आहे. या बस गाडय़ा तीन हात नाका, नितीन कंपनी येथून घोडबंदर मार्गावर चालविल्या जात आहेत. तीन हात नाका येथून अवघ्या काही फूटांच्या अंतरावर असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळूनच या खासगी बस गाडय़ा घोडबंदर मार्गावर चालविल्या जात आहेत. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांकडून दूर्लक्ष करण्यात येत आहे.

या बस गाडय़ा घोडबंदर येथील पातलीपाडा, कासारवडवली येथून कोपरी येथील गुरूद्वाराजवळील सेवा रत्याहून पुन्हा तीन हात नाका येथे सोडल्या जातात. यासंदर्भात वाहतूक पोलिसांनी कोपरीतून केवळ कंपन्यांच्या गाडय़ा सुटतात.

त्यातून कर्मचाऱ्यांबरोबरच अवैध वाहतूक होत असेल तर आम्ही तपासणी करू असे सांगितले होते. मात्र वाहतूक विभाग अशा प्रकारची कोणतीही तपासणी करीत नसून त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक सुरूच आहे.

कोपरीतील अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात आम्ही मोहीम उघडली होती. त्यामुळे त्याला आळा बसला होता. आता पुन्हा ही वाहतूक सुरू झाली असेल, तर तात्काळ कारवाई केली जाईल.

संदीप पालवे, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त