तारापूर औद्योगिक क्षेत्रातील वारंवार अपघात घडणाऱ्या एका कारखान्यात पुन्हा बेकायदा पद्धतीने उत्पादन घेताना स्फोट झाला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून उत्पादन बंद करण्याचे प्रादेशिक अधिकारी ठाणे यांनी निर्देश दिले  होते.  स्थानिक अधिकारी यांच्या संगनमताने कारखाना सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील साळवी केमिकल या अतिघातक रासायनिक कारखान्यात अनेकदा अपघात झाले असताना देखील आजवर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने वारंवार कारखानदारांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. असाच प्रकार मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास घडला. बेकायदा पद्धतीने रिअ‍ॅक्टरमध्ये प्रक्रिया सुरू असताना रासायनिक अभिक्रिया होऊन जोरदार स्फोट झाला. यातच रिअ‍ॅक्टरच्या काही अंतरावरच रासायनिक पदार्थ असलेल्या मोनोकोराईड अ‍ॅसिडच्या गोणी ठेवल्या असल्यांने गोणींनी पेट घेतला. याबाबत अग्निशमन दलाला लागलीच माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती.

बेकायदा पद्धतीने कारखाना सुरू ठेवुन अपघात झाल्याने कारखान्यांवर कारवाई बाबत अहवाल पाठविणार असल्याचे तारापूरमधील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनीष होरकळ यांनी सांगितले.

साळवी केमिकल मध्ये सकाळी कामावर आलेला राहुल कुमार या कामगाराला ५ ऑगस्ट रोजी सकाळच्या वेळी घातक रासायनिक वायूची बाधा झाली होती.त्याआधी २५ जानेवारी रोजी पहाटे तांत्रिक बिघाडामुळे कारखान्यात स्फोट झाला होता. यावेळी तेथे कामावर उपस्थित असलेल्या वैभव अहिर याच्या डोळ्याला दुखापत होऊन गंभीर जखमी झाले होते.