अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेरील बेकायदा रिक्षा थांबे आता अधिकृत रिक्षाचालकांना अडचणीचे ठरू लागले आहेत. त्यामुळे आता अंबरनाथमध्ये अधिकृत विरुद्ध अनधिकृत रिक्षाचालक असा नवा संघर्ष पाहावयास मिळतो आहे.
अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्वेस रेल्वे स्थानकाजवळच एकमेव अधिकृत रिक्षा थांबा आहे. मात्र स्थानकाबाहेरच असलेल्या शिवाजी चौक परिसरात मोठय़ा प्रमाणावर रिक्षाचालक बेकायदेशीररीत्या रिक्षा उभ्या करत असतात. असे रिक्षाचालक रिक्षा थांब्यावर न जाता चौकातून परस्पर प्रवासी रिक्षात भरतात आणि मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे थांब्यावर रांगेत रिक्षा लावणाऱ्या रिक्षाचालकांना प्रवासी मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यांच्या हक्काचे प्रवासी पळवण्याचे काम हे रांगेत न उभे राहणारे रिक्षाचालक करत असल्याने रिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणी अधिकृत थांब्यावर राहणाऱ्या रिक्षाचालकांचा रोष वाहतूक पोलिसांवर आहे. ते नियमितपणे कारवाई करत नाहीत, कारवाई केली तरी तेवढय़ापुरती असते. कारवाई करून वाहतूक पोलीस परततात तोच, अनधिकृत रिक्षाचालक पुन्हा रस्त्यावर रिक्षा उतरवरत असतात, त्यामुळे त्यांच्यावर वचक राहिलेला नाही. याचे नुकसान मात्र आमच्यासारख्या नियम पाळणाऱ्या रिक्षाचालकांना होतो, अशा भावना आशिष देशपांडे या रिक्षाचालकांने व्यक्त केल्या आहेत.
शिवाजी चौकात बेकायदा रिक्षा उभ्या केल्याने संध्याकाळच्या वेळी मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. रिक्षा चालकांसोबतच रात्रीच्या वेळी भाजी विक्रेते, खाद्यपदार्थाच्या हातगाडय़ा यात अधिकची भर घालतात. त्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
कारवाईनंतरही जैसे थे
दरम्यान, गुरुवारी वाहतूक पोलिसांकडून बेकायदेशीर रिक्षांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा रिक्षाचालकांकडून होणारी वाहतूक कोंडी कायम आहे.

भंगार रिक्षाही रस्त्यावर?
भंगारात काढलेल्या अनेक रिक्षाही रस्त्यावर चालताना दिसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा रिक्षा वाहतूक पोलिसांच्याच वरदहस्ताने चालत असल्याचा आरोप रिक्षाचालकांकडून होतो आहे. सकाळी ११ पर्यंत आणि संध्याकाळी ७ नंतर या रिक्षा रस्त्यावर उतरत असतात. त्यामुळे याकडे वाहतूक पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जाते. याबाबत वाहतूक पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.