गणेश देवलनगरातील रस्त्यावर दुतर्फा रिक्षा

भाईंदर : भाईंदर पश्चिमेकडील गणेश देवलनगर झोपडपट्टी मार्गाच्या दोन्ही बाजूंस मोठय़ा प्रमाणात रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहनांना ये-जा करण्यासाठी अडथळे निर्माण झाले आहेत.

भाईंदर पश्चिम परिसरात शिवसेना गल्लीजवळ गणेश देवलनगर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टी परिसरात सुमारे ५ हजारांहून अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. या कुटुंबीयांपैकी अनेक नागरिक रिक्षा चालवून  उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु या रिक्षा नागरी वस्तीच्या मुख्य रस्त्यावरच उभ्या करण्यात येत असल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. नागरिकांना येथून चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे चार चाकी आणि मोठी वाहने जाण्याकरिता मार्ग मोकळा करण्याची मागणी केली जात आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. येथील झोपडपट्टी परिसरातदेखील करोनाचा शिरकाव झाला आहे. पालिकेकडून या भागात करोनावर नियंत्रण मिळवण्याकरिता मोहीम राबवण्यात येत आहे. परंतु मुख्य प्रवेशद्वारावरच रिक्षाचा विळखा असल्यामुळे  रुग्णवाहिकेला या भागात नेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.या भागात राहणाऱ्या नागरिकांचा उदरनिर्वाह रिक्षावरच चालत असल्यामुळे त्यांना वाहने उभी करण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच हा प्रश्न दूर करावा अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत.