23 October 2018

News Flash

मच्छीमार संतप्त!

वसईच्या खाडीत पुन्हा यांत्रिक पद्धतीने रेती उत्खनन करण्याचा लिलाव

वसईच्या खाडीत पुन्हा यांत्रिक पद्धतीने रेती उत्खनन करण्याचा लिलाव

वसई खाडीत यांत्रिक पद्धतीने रेती उत्खनन करण्यासाठी लिलाव जाहीर करण्यात आल्याने मच्छीमारांमध्ये संताप पसरला आहे. नौकानयन सुरळीत करण्याचे कारण देऊन या ठिकाणाचा किनारा वाळुमाफियांसाठी खुला करण्याचा डाव असल्याचा आरोप ‘कोळी युवाशक्ती’ने केला आहे. खाडीत यांत्रिक पद्धतीने रेती उत्खनन झाल्यास मच्छीमारांना मोठा धोका निर्माण होणार असून ही लिलाव प्रक्रिया हाणून पाडणार असल्याचा निर्धार मच्छीमार संघटनेने केला आहे.

किल्लाबंदर पाचूबंदर येथ सुमारे १५ हजारांहून अधिक मच्छीमार कुटुंबे राहतात. मासेमारी व्यावसायावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. या ठिकाणी तीनशेच्या आसपास लहान-मोठय़ा सागरी मासेमारी नौका आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी खाडीतील रेती गटात यांत्रिक पद्धतीने रेती उत्खनन करून त्याचा लिलाव करण्याचा ठेका जाहीर केला आहे. नौकानयन सुरळीत करण्याचे कारण देत हा लिलाव जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या ठिकाणी होत असलेल्या अनधिकृत रेती उपशामुळे येथील किनार आधीच  खचण्यास सुरुवात झालेली आहे. किनाऱ्याची धूप होत असून मासे सुकवण्यासाठीची जागा नष्ट होऊ  लागली आहे. त्यामुळे या उत्खननास आणि लिलाव प्रक्रियेस विरोध आहे.

किनाऱ्याची होत असलेली धूप लक्षात घेऊन ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी १५ नोव्हेंबर २००६ रोजी रेती उत्खनन करण्यास बंदी घातली होती, तरीही रेती उत्खनन सुरूच राहिल्याने येथील कोळी समाजाच्या वतीने कोळी युवाशक्ती या संघटनेने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. दोन वर्षांपूवी अशाच पद्धतीने लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यावेळीही मच्छीमारांनी मोठे आंदोलन उभारून ही लिलाव प्रक्रिया रद्द करण्यास प्रशासनाना भाग पाडले होते. रेती उत्खननास बंदी असताना आजही बेकादेशीररित्या रेती उत्खनन सुरूच आहे. अशा वेळी प्रथमच ड्रेझरने खाडीत रेती उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका कंपनीला यासाठी साडेचार कोटी रुपयांचा ठेका देण्यात आल्याचे कोळी युवाशक्तीच्या दिलीप माठक आणि संजय कोळी यांनी सांगितले. धूप होत असेल पाण्याच्या क्षाराचे प्रमाण होत असतील तर त्या भागात रेती उत्खननास परवानगी देऊ  नये, असा नियम आहे. मात्र तरीही या रेती उत्खननास परवागनी दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. ही लिलाव प्रक्रिया रद्द न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. वसईच्या खाडीत नौकानयन मार्ग सुरळीत होण्याच्या दृष्टीने रेती उत्खनन करण्यासाठी प्रशासनाने ही लिलाव प्रक्रिया सुरू केली असली तरी अशी कोणतीही मागणी येथील मच्छीमारांनी केली नाही, तसेच नौकानयनाच्या दृष्टिकोनातून असा कोणाताही त्रास मच्छीमारांना होत नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

बेकायदा रेती उत्खनन सुरू

किल्लाबंदर पाचूबंदर किनाऱ्यालगच मत्स्य प्रजातींच्या प्रजनन काळातही दिवस-रात्र अनधिकृत रेती उत्खनन होत आहे. यामुळे मत्स्यप्रजातींचा ऱ्हास होत आहे. पाचूबंदर किनाऱ्यासमोरील सॅण्ड बार हा मोठय़ा उधाणाच्या वेळी महाकाय लाटा अडवण्याचे काम करतो. या सॅण्ड बारवर उभे राहून वाळुमाफिया फावडय़ाने रेती उत्खनन करतात. हा सॅण्ड बारही नष्ट होत असून किनाऱ्यालगच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. अर्नाळा येथेही रेती उत्खननानमुळे किनाऱ्यावर खड्डे पडले असून अनेकाना जीव गमवावा लागत आहे. यामुळे बेकादेशीर रेती उत्खनन बंद करावे आणि नव्याने यांत्रिक रेती उत्खननास परवानगी देऊ  नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

First Published on January 13, 2018 3:57 am

Web Title: illegal sand excavation in vasai 2