जिल्हा प्रशासनाची बंदी असताना सक्शन पंपाद्वारे उपसा; प्रजनन काळातच सागरी जीवसृष्टीवर संकट

ठाणे : ठाणे जिल्ह्य़ातील खाडीत सक्शन पंपाद्वारे रेती उपसा करण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी घातली असली तरी जिल्ह्य़ातील मुंब्रा आणि दिवा खाडीमध्ये पावसाळ्यातही अवैधरित्या पंपाद्वारे रेती उपसा सुरू असल्याचे दिसून येते. या खाडीत दहा ते बारा बोटींच्या साहय्याने दररोज रेती उपसा केला जात असून या रेती उपसाकरिता कांदळवनाची कत्तल केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंब्रा आणि दिवा भागात वाळू माफियांचे मोठय़ा प्रमाणात जाळे आहे. खाडीतून डुबीद्वारे रेती काढण्यास परवानगी आहे. मात्र, मुंब्रा आणि दिवा परिसरात पंप लावून रेती उपसा केला जातो. या उपशामुळे येत्या काळात खाडीला धोका निर्माण होण्याची शक्यता पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. खाडी किनारी असलेल्या कांदळवनाजवळ मोठय़ा प्रमाणात रेती मिळते.

रेती उपसा करण्यासाठी कांदळवनाची कत्तल केली जात असल्याचे चित्र आहे. भरतीच्या वेळेतही रेती उपसा करण्याचे प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. मुंब्रा, दिवा, डोंबिवली आणि कल्याण खाडीमध्ये हा प्रकार दिसून येतो.

पावसाळ्याचा काळ हा अनेक सागरी जीवांच्या प्रजननाचा काळ असतो. अशा वेळी मच्छीमारही मासेमारी करणे टाळतात. रेती उपसा करण्यासाठी वापरला जाणारा सक्शन पंप अतिशय वेगाने खाडीतील पाणी आणि चिखल खेचून घेतो. या वेळी अनेक छोटे मासे आणि सूक्ष्म जीवही या पंपच्या सहाय्याने खेचले जातात. त्यामुळे भर पावसाळ्यात सुरू असणाऱ्या रेती उपशामुळे खाडीतील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, यासंदर्भात ठाण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी सांगितले की, रेती उपसा होत असलेल्या ठिकाणी सातत्याने कारवाई करण्यात येते. ‘रेती उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे,’ असेही ते म्हणाले.