26 September 2020

News Flash

नियमबाहय़ गतिरोधकांचा वाहनचालकांना अडथळा

गतिरोधक बसविताना ‘इंडियन रोड काँग्रेस’कडून नियमावली आखून देण्यात आलेली आहे.

पाठ, कंबरदुखीचा त्रास; अपघातांत वाढ

अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि वेगावर नियंत्रण राहावे यांसाठी रस्त्यावर गतिरोधक तयार केले जात असले तरी मीरा-भाईंदरमध्ये गतिरोधक बसविताना नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याचा त्रास वाहनचालकांना आणि प्रवाशांना होत असून अपघातांच्या प्रमाणातही वाढ झालेली आहे. त्यामुळे हे गतिरोधक बदलावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

गतिरोधक बसविताना ‘इंडियन रोड काँग्रेस’कडून नियमावली आखून देण्यात आलेली आहे. या नियमांचे पालन करूनच गतिरोधक तयार करायचे असतात. गतिरोधकांची उंची किती असावी? दोन्ही बाजूला उतार कसा असावा? याबाबतची माहिती या नियमांमध्ये असते. मात्र मीरा-भाईंदरमध्ये हे नियम धाब्यावर बसवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांना पाठ व कंबरदुखीचा त्रास होत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले, त्याशिवाय वाहनांचेही नुकसान होत असल्याचे समजते.

मीरा रोड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते रवींद्र रघुवंशी यांनी याबाबतच्या नियमांची तसेच मुंबई महापालिकेकडून याबाबत घेण्यात येणाऱ्या दक्षतेची माहिती मागवली असता मीरा-भाईंदर प्रशासनाकडून मात्र या नियमांची पायमल्ली होत असल्याचे उघड झाले आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने परिपत्रक काढून चुकीच्या गतिरोधकाच्या बांधकामामुळे रस्त्यावर अपघात झाल्यास संबंधित अधिकाऱ्यास व्यक्तिश: जबाबदार धरून त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

मुंबई महापालिकेनेही रस्त्यावर बांधण्यात येणारे गतिरोधक शासनाचे परिपत्रक तसेच नियमांचे पालन करून बांधण्यात यावेत तसेच चुकीचे गतिरोधक तातडीने काढून टाकण्यात यावेत, असे आदेश आपल्या अभियंत्यांना दिले असल्याचे पत्र रवींद्र रघुवंशी यांना दिले आहेत. नागरिकांवर तक्रारी आल्या की प्रशासन जागे होते व गतिरोधक तोडून पुन्हा नियमानुसार ते बनवते यात करदात्या नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याचा आरोप रघुवंशी यांनी केला आहे. गतिरोधक बांधताना नियमानुसार बांधण्याचे स्पष्ट आदेश अभियंत्यांना देण्यात यावेत  तसेच चुकीचे गतिरोधक बसविणाऱ्या कंत्राटदारांची देयके अदा करण्यात येऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चुकीचे गतिरोधक

मीरा-भाईंदरमधील अंतर्गत रस्त्यांवर बांधण्यात येणाऱ्या गतिरोधकांवर महापालिका अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही.

कंत्राटदाराला गतिरोधक बांधण्याचे काम दिल्यानंतर तो नियमानुसार बांधत आहे की नाही यावर महापालिकेच्या अभियंत्यांनी देखरेख ठेवणे आवश्यक आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदार आपल्या मनाने गतिरोधक बांधत आहेत.

गतिरोधक दुरून नजरेत यावेत यासाठी अंधारातही चमकतील असे पांढरे पट्टे त्यावर मारणे गरजेचे आहे. परंतु कित्येक ठिकाणी हे पट्टे नसल्याने वाहनचालक गडबडून जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 2:57 am

Web Title: illegal speed breakers barrier for motorists
Next Stories
1 पाच मिनिटांत घर लुटणारा चोर अटकेत
2 मॉडेलिंगच्या आमिषाने तरुणींचे लैंगिक शोषण
3 पालिका निवडणुकीच्या तोंडावर कुंपणउडय़ा!
Just Now!
X