13 December 2017

News Flash

बेकायदा दूरसंचार केंद्र चालविणारी टोळी उघडकीस

भिवंडी येथील प्रकार; ३० कोटींचा महसूल बुडविला

खास प्रतिनिधी, ठाणे | Updated: May 19, 2017 2:46 AM

भिवंडी येथील प्रकार; ३० कोटींचा महसूल बुडविला

भिवंडी येथील भोईवाडा परिसरात बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालविणारी टोळी  ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने उघडकीस आणली असून, असून या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे.

ही टोळी बेकायदा टेलीफोन एक्स्चेंजच्या माध्यमातून युएई, सौदी अरेबिया या देशांमधून येणारे आतंरराष्ट्रीय दूरध्वनी तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतातून येत असल्याचे भासवीत होते. त्यामुळे या दूरध्वनीची डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन विभागाकडे नोंद होत नसल्याने या टोळीने भारत सरकारचा आतापर्यंत ३० कोटी रुपयांचा महसूल बुडविला आहे.

तसेच या नोंदीअभावी हा दूरध्वनी नेमका कोणत्या देशातून येतो, याचा तपास सुरक्षा यंत्रणांना करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे या दूरध्वनीचा वापर देशविघातक कृत्यांसाठी करण्यात येत होता का, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

भिवंडी येथील भोईवाडा परिसरात बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालविण्यात येत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या भिवंडी युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली होती. त्या आधारे त्यांच्या पथकाने या भागात धाडी टाकून चार बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज उद्ध्वस्त केली. या प्रकरणात एकूण चार जणांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सुफियान अन्सारी, इक्बाल अहमद सुलेमान, मोहम्मद अस्लम शेख आणि युनूस इम्तियाज आजमी यांचा समावेश आहे. या धाडीमध्ये १८ सिम्बॉक्स, ९ राऊटर, ४२० सिमकार्ड, दोन लॅपटॉप, नोटपॅड, पाच मोबाइल आणि १५ हजार रुपये तसेच इतर इलेट्रॉनिक उपकरणे आदी १७ लाख ५४ हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार टाटा आणि रिलायन्स कंपनीचा एक माजी कर्मचारी असून त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती आयुक्त सिंग यांनी दिली.

धाडीमध्ये जप्त करण्यात आलेल्या सिमबॉक्सला राऊटरच्या माध्यमातून इंटरनेट कनेक्शन जोडण्यात आले होते.

देशविघातक कृत्यासाठी वापर?

नोंद होत नसल्यामुळे सुरक्षा यंत्रणांना या दूरध्वनीचा तपास करणेही शक्य होत नव्हते. अशा दूरध्वनीचा वापर देशविघातक कृत्ये आणि इतर अवैध कामांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या दूरध्वनीचा वापर देशविघातक कृत्यांसाठी करण्यात येत होता का, याचा तपास करण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंजद्वारे हवाला रॅकेटही चालविण्यात येत असल्याची शक्यता नाकारता येत नसून त्या दिशेनेही तपास सुरू आहे.

विभागाकडे नोंद नाही

या यंत्रामध्ये त्यांनी विविध सिमकार्ड बसविली होती. याद्वारे आंतरराष्ट्रीय कॉल प्राप्त करून ते भारतीय मोबाइल किंवा दूरध्वनी क्रमांकाशी जोडले जायचे. त्यामुळे परदेशातील क्रमांकाऐवजी त्या ठिकाणी भारतातील क्रमांक दिसायचे. या प्रकारामुळे या दूरध्वनीची डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन विभागाकडे नोंद होत नसल्याने या टोळीने भारत सरकारचा आतापर्यंत ३० कोटी रुपयांचा महसूल बुडविला आहे.

 

First Published on May 19, 2017 12:43 am

Web Title: illegal telecommunication center in bhiwandi