वाहतूक सेवकांची मदत घेऊन बेकायदा पद्धतीने वाहनांची तपासणी; पोलीस ठाण्यात तक्रार

लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमणूक केली नसतानाही आणि कार्यालयीन वेळ सुरू होण्यापूर्वीच अंबरनाथमधील वाहतूक पोलीस पहाटेच्या वेळी काटई-कर्जत महामार्गावर बेकायदा पद्धतीने वाहनांची तपासणी करून वसुली करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असलेल्या वाहतूक सेवकांची (ट्राफिक वार्डन) मदत घेतली जात आहे, अशी तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे.

सकाळी ९ च्या आधी व रात्री ९ च्या नंतर वेळेचे कारण देत वाहतूक कोंडीतून स्वत:ची सुटका करून घेणारे वाहतूक पोलीस अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या महामार्गावर मात्र पहाटेच्या वेळी अतिकर्तव्यदक्षता दाखवत असल्याची माहिती समोर आली आहे. अंबरनाथमधून जाणाऱ्या काटई कर्जत महामार्गावर कायम वाहनांची गर्दी असते. खोणी, तळोजा, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर अशा मोठय़ा औद्योगिक वसाहती या महामार्गावर आहेत. त्यामुळे येथून अवजड वाहनांची वाहतूक चोवीस तास सुरू असते. त्यातच कर्जत, मुरबाड, पुणे आणि मुंबई उपनगरात जाण्यासाठी या रस्त्याचा वापर खासगी वाहनेही करतात. या मार्गावरील टी पॉइंट जंक्शन, आनंदनगर वसाहतीचा चौक, नेवाळी, खोणी या भागात कायम वाहतूक कोंडी होत असते. अनेकदा या ठिकाणी वाहतूक पोलीस नसल्याने वाहनचालक किंवा आसपासचे दुकानदार, गॅरेज आणि ढाबेवाले कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरत असतात.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून अंबरनाथमधून जाणाऱ्या या महामार्गावर पहाटेच्या वेळी वाहतूक पोलीस तपासणीच्या नावाखाली वाहनांना अडवत असल्याचे चित्र आहे. अंबरनाथमधील सत्यजीत बर्मन या सामाजिक कार्यकर्त्यांने हा प्रकार आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला आहे. ८ नोव्हेंबर रोजी अशाच एका प्रकारात एक वाहतूक पोलीस कंत्राटी पद्धतीने फक्त वाहतूक नियंत्रणासाठी नेमलेल्या वाहतूक नियंत्रण सेवकांच्या मदतीने अवजड वाहने अडवून त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी करत असल्याचे आढळून आले आहे. तर या वेळी वाहतूक पोलिसाच्या गणवेशावर नाव आणि हुद्दय़ाचा बिल्लाही नसल्याचे निदर्शनास आले आहे. ज्या वाहतूक पोलिसांचे काम सकाळी ९ नंतर सुरू होते ते पोलीस सकाळी ७ ते साडेसात च्या दरम्यान कोणत्याही नेमणुकीशिवाय बेकायदा पद्धतीने तपासणी करून  वसुली करत असल्याचे दिसून आल्याचा आरोप सत्यजीत बर्मन यांनी केला आहे. याप्रकरणी आपण शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीनेच हे प्रकार सुरू असल्याचा दावा बर्मन यांनी केला आहे.

या प्रकरणाची तक्रार आली आहे. संबंधित वाहतूक पोलिसाची चौकशी करणार असून वार्डन आणि पोलिसांची बाजू ऐकून घेतली जाणार आहे. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल
– दिलीप उगले, सहायक पोलीस आयुक्त, वाहतूक पोलीस.