News Flash

भिवंडीतील रासायनिक गोदामांचे इमले ‘जैसे थे’

गोदामे बंद करण्यात आली असली तरी ही बेकायदा बांधकामे अद्याप तशीच उभी आहेत.

भिवंडीतील रासायनिक गोदामांचे इमले ‘जैसे थे’
गोदामे बंद करण्यात आली असली तरी ही बेकायदा बांधकामे अद्याप तशीच उभी आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून गोदामांना टाळे; मात्र, बांधकामांवर कारवाई नाही

पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या पाहणी दौऱ्यानंतर भिवंडीतील रासायनिक गोदामे सील करत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या जिल्हा प्रशासनाने या बेकायदा गोदामांच्या बांधकामांवरील कारवाईसंबंधी मात्र हात वर केले आहेत. बेकायदा रासायनिक गोदामांचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्णा, राहनाळ, वळ, दापोडा, गुंदवली तसेच ओवळी यांसारख्या गावांचा परिसर मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात येत असल्याने या बांधकामांवर त्यांच्याकडून कारवाई होणे अपेक्षित आहे, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. बेकायदा बांधकामांसंबंधी ‘एमएमआरडीए’ची आतापर्यंतची संथ भूमिका लक्षात घेता गोदामे सील करण्याची कारवाई केवळ वरवरची मलमपट्टी ठरणार असल्याची या भागात चर्चा आहे.

एकीकडे मोठय़ा कंपन्यांचे माल साठवणुकीचे केंद्र म्हणून भिवंडी परिसर विकसित होत असताना दुसरीकडे येथील गावांपासून हाकेच्या अंतरावर नागरी वस्तीलगतच बेकायदेशीररीत्या रासायनिक पदार्थाचा साठा होत असल्याचे भयावह चित्र गेल्या काही वर्षांत उभे राहिले आहे. या भागातील लहान-मोठी दुकाने, नागरी वसाहती तसेच सार्वजनिक ठिकाणांपासून लगत असलेल्या मोकळ्या जमिनी बळकावून त्यावर राजरोसपणे बेकायदा गोदामे उभारली जात असून तेथेच अत्यंत ज्वलनशील अशा रसायनांचा साठा केला जात असल्याचे उघड झाले आहे. मध्यंतरी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या भागाचा दौरा करत काही गोदामांची पाहणी केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने येथील काही गोदामे सील केली.

गोदामे बंद करण्यात आली असली तरी ही बेकायदा बांधकामे अद्याप तशीच उभी आहेत. राज्य सरकारने या भागाच्या नियोजनाचे अधिकार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) दिले आहेत. त्यामुळे ही कारवाई प्राधिकरणानेच करावी, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. यासंबंधी एमएमआरडीएला वेळोवेळी माहिती देण्यात आली आहे, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

यंत्रणांमधील टोलवाटोलवीचा फायदा भूमाफिया उचलत आहेत. एमएमआरडीएच्या आधिपत्याखाली असलेल्या परिसरातच बेकायदा बांधकामांना ऊत आला असून एमएमआरडीएने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. दरम्यान, रासायनिक गोदामे सील करताना तेथील बांधकामांची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली असून त्यावर कारवाई करण्याची मोहीम लवकरच आखली जाईल, अशी प्रतिक्रिया ‘एमएमआरडीए’तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  दिली.

राजकीय छत्र

भिवंडी तसेच आसपासच्या परिसरातील मोकळ्या जमिनी तसेच खाडी किनाऱ्यांवर भराव टाकून गेल्या काही वर्षांत हजारोंच्या संख्येने बेकायदा गोदामे उभी राहिली आहेत. मुंबई, ठाण्यापासून जवळ असल्याने या ठिकाणी मोठमोठय़ा कंपन्यांनी येथील गोदामांचा वापर सुरू केला आहे.या धंद्यात मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असल्याने गेल्या काही वर्षांत या भागात बेकायदा गोदामे उभारण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. या भागातील एक बडा लोकप्रतिनिधी या गोदाममालकांचा तारणहार मानला जातो. महिन्याकाठी काही कोटी रुपयांची रक्कम केवळ भाडय़ापोटी या नेत्याला मिळत असल्याची चर्चा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 4:17 am

Web Title: illegal warehouses for chemical in bhiwandi sealed but no action on construction
Next Stories
1 समाजमंदिरावर धूळ
2 बडम, छोटा, प्यारा.. स्वॅगवाला भाई!
3 विरार-सीएसएमटी लोकलला लाल कंदील
Just Now!
X