ऋषिकेश मुळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कलश, फायबरचे खोके अपुरे; सांडलेले निर्माल्य वेळीच न उचलल्यामुळे परिसरात दुर्गंधी

स्वच्छ ठाणे शहराचा डंका पिटवणाऱ्या महापालिका प्रशासनाने विसर्जन घाटांवरील सोयीसुविधांकडे यंदा दुर्लक्ष केल्याचे दिसते. कृत्रिम तलाव व विर्सजन घाटांजवळ निर्माल्य टाकण्यासाठी पुरवण्यात आलेले कलश मोडकळीस आले आहेत. विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर निर्माल्यासाठी फायबरचे अतिरिक्त खोके पुरवण्यात आले असले तरी हे खोकेही पुरेसे नाहीत. अर्धवट मोडलेल्या कलशांतून निर्माल्य रस्त्यावरच पडत आहे.

दीड आणि पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर विसर्जनस्थळांच्या परिसरातील रस्ते स्वच्छ करण्याची तसदीही महापालिकेने घेतलेली नाही. उघडय़ावरच पडलेल्या निर्माल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याचा त्रास पादचारी तसेच विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना होत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दीड दिवसांत १४ हजार ८२१ गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावांत १० हजार ३८६ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. पाच दिवसांत १७ हजार ७३० गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावांत ८ हजार ४२० गणेश मूर्ती तसेच ५९१ गौरी मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासाठी आणलेले निर्माल्य हे तलावात जाऊन कृत्रिम तलाव तसेच खाडी प्रदूषित होऊ नये यासाठी गणेश मूर्ती विसर्जनाच्या ठिकाणी महापालिकेतर्फे निर्माल्य कलशांची सुविधा पुरवण्यात आली आहे. तसेच विसर्जन घाटांच्या प्रवेशद्वाराजवळ समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रकमध्येही निर्माल्य संकलित केले जाते. यंदा विसर्जनादरम्यान ठाण्यातून एकूण ३३ टन निर्माल्य जमा झाल्याचे समर्थ भारत व्यासपीठ संस्थेने सांगितले. मात्र हे निर्माल्य टाकण्यासाठी गणेश घाटांवरील निर्माल्य कलश अपुरे असल्याचे गणेश मुर्ती विसर्जन करण्याकरिता येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे.

अतिरिक्त निर्माल्य कलश गरजेचे

मासुंदा, उपवन, घोसाळे तलाव, बाळकुम खाडी, रायलादेवी तलाव, रेतीबंदर, कळवा खाडी, म्हात्रे तलाव या ठिकाणी निर्माल्य कलशांची संख्या वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. तलावाजवळ असलेल्या निर्माल्य कलशांचीही दुर्दशा झाली असून हे कलश मधूनच फुटल्याने निर्माल्य रस्त्यावरच पडते. कलशाच्या बाहेर पडलेले निर्माल्य उचलण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सक्रीय नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

९९ टक्के शुध्द निर्माल्य गोळा झाले आहे. निर्माल्य गोळा करूनच भाविकांना घाटावर प्रवेश दिला जातो. मात्र अनेकदा नागरिक सकाळीही कलशात निर्माल्य टाकतात. त्यामुळेही हे कलश काठोकाठ भरून जातात.

– भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, समर्थ भारत व्यासपीठ

विसर्जनस्थळी पुरेशा प्रमाणात फायबरचे निर्माल्य कलश उपलब्ध करून दिले आहेत. मात्र या कलशांमधूनही निर्माल्य बाहेर पडत असल्यास तात्काळ संबंधित यंत्रणांना सांगून निर्माल्य दूर हटवण्यात येईल.

– मनीषा प्रधान, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immersion place nirmalya on the road
First published on: 20-09-2018 at 02:40 IST