एखाद्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला आपण चांगल्या हुद्दय़ावर असावे असे वाटत असते. त्याचप्रमाणे मला चांगला संगीतकार व्हायचे आहे, असे गायक रोहित राऊत याने सांगितले. तर गीतकार मंदार चोळकर याने तरुणांनी कविता वाचाव्यात. वाचनातून आपण प्रगल्भ होत जातो, असा संदेश ‘कविता, गप्पा, आणि..’ या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या युवकांना दिला. एस. प्रॉडक्शनच्यावतीने रविवारी कल्याणमधील सुभेदारवाडी विद्यालयामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कविता, साहित्य यासारख्या गोष्टींकडे सध्याची पिढी दुर्लक्ष करत असल्याची टीका अनेक जण करत असतात. पण ही टीका खोडून काढण्यासाठी संपदा जोशी आणि सौरभ नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. भाषा संवर्धनाचे कार्य त्यांनी हातात घेतले आहे. या वेळी मंदार आणि रोहित यांनी आपला प्रवास रसिकांसमोर उलगडला. या वेळी मंदार चोळकर यांनी मालिका आणि चित्रपट दोन्हींसाठी गाणी लिहायला आवडतात, तर रोहितने गाण्याचे विविध प्रकार गायला आवडत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर मंगेश पाडगावकर, सुरेश भट, वि. वा. शिरवाडकर यांच्या कविता या वेळी सादर करण्यात आल्या. रोहित राऊतने या वेळी यारा-यारा, का रे दुरावा ही गाणी सादर केली. संपदा जोशी आणि सौरभ नाईक यांनी आपल्या चहा-कॉफी, पाऊस, आयुष्य अशा विविध विषयांवरील स्वरचित कविता प्रेक्षकांसमोर सादर केल्या. भाषासंवर्धनासाठी अशा प्रकारचे विविध कार्यक्रम करत राहणार असल्याचे ते म्हणाले.