पालिका प्रशासनाच्या हलगर्जीमुळे प्रकल्प रखडले
अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस
शहरातील महत्त्वाचे विकास प्रकल्प रखडले आहेत, तर काहींची वाताहत झाली असल्याचे विद्यमान आयुक्त ई. रवींद्रन यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या आयुक्तांनी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.तत्कालीन आयुक्तांच्या गळ्यातील ताईत तसेच काही ठरावीक पदाधिकाऱ्यांचे लाडके, अशी ओळख असणाऱ्या कुलकर्णी यांना नोटीस बजाविण्यात आल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. डोंबिवलीत टिळक रस्त्यावर पालिकेची दोन मजल्याची भव्य वास्तू उभी राहात आहे. या इमारतीचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी नगररचना विभागाची परवानगी घेणे प्रकल्प विभागावर बंधनकारक होते. नगररचना विभागाकडून इमारत उभारणीची परवानगी घेण्यास प्रकल्प विभागाकडून टाळाटाळ करण्यात आली. एमआरटीपीच्या कलम ५८ अंतर्गत आतापर्यंत ही परवानगी पालिकेकडून गृहीत धरली जात होती. आता हे वाचनालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या बांधकामाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळण्यासाठी प्रकल्प विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. या वेळी आयुक्त रवींद्रन यांना या नवीन वास्तूबाबत प्रकल्प विभागाने नगररचना विभागाला काही कळविले नसल्याचे निदर्शनास आले. प्रकल्प विभागाच्या या हलगर्जीपणाबद्दल आयुक्तांनी प्रकल्प विभागाला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.आधारवाडी येथे अनेक वर्षांपासून एक रस्ता रखडला आहे. या रस्त्यामधील घर दूर करून रस्ते काम पूर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रकल्प अधिकाऱ्याला दिले होते. परंतु ही कार्यवाही करण्यात प्रकल्प विभागाने चालढकलपणा केला. वेळेत ही कार्यवाही न केल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. सिमेंट रस्त्यांचा यापूर्वीचा सल्लागार मे. मोनार्च कंपनीने जानेवारीत पालिकेचे काम सोडून दिले. त्यामुळे रस्ते प्रकल्प रखडले. दरम्यानच्या काळात पालिकेने काही कामे पूर्ण केली. या ठेकेदाराला पालिकेने सुमारे चार कोटींचे शुल्क मोजले होते. प्रशासनाने सिमेंट रस्त्यांची उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी ध्रुव कन्सल्टन्सी हा नवीन सल्लागार नेमण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ७५ टक्के सिमेंट रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचा प्रकल्प विभागाचा दावा आहे. मग उर्वरित २५ टक्के कामांसाठी पुन्हा सल्लागार नेमण्याची गरज काय, त्याला एवढे शुल्क कशासाठी द्यायचे, अशा तक्रारी दक्ष नागरिक मनोज कुलकर्णी यांनी आयुक्तांना सादर केल्या. हा सगळा घोळ प्रकल्प विभागाने आयुक्तांना न सांगितल्याने आयुक्त रवींद्रन यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पांमध्ये प्रकल्प विभागाने हलगर्जीपणा केल्याचा ठपका आयुक्त रवींद्रन यांनी ठेवून प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

नोटीस आली तर उत्तर देऊ

सिमेंट रस्त्यांसह सर्व विकासकामे सुरू आहेत. आयुक्तांनी स्वत: पुढाकार घेऊन ही कामे मार्गी लागतील यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काही विकासकामांमध्ये अडथळे आहेत. ते बाजूला करून कामे मार्गी लावण्यात येत आहेत. शक्यतो हलगर्जीपणा कोठे होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. आपणाला आयुक्तांकडून कोणत्याही प्रकारची कारणे दाखवा नोटीस मिळालेली नाही. तशी हालचाल असेल तर कळेलच. समजा, मिळाली तर आपण त्याला उत्तर देऊन आयुक्तांचे समाधान करू.

प्रमोद कुलकर्णी, प्रकल्प अभियंता