७ हत्या, २३५ घरफोडय़ा, ६४ जबरी चोऱ्यांचा अद्याप छडा नाही

वसई-विरार शहरांतील गुन्हेगारी घटनांत वाढ होत असताना या गुन्ह्यंचा छडा लावण्यात पोलीस दल अपुरे पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत घडलेल्या गुन्हेगारीच्या घटना आणि त्यांचा यशस्वी तपास यांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता महत्त्वाच्या गुन्ह्यंतील तपास अधांतरीच असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, सध्या सर्व मोठय़ा शहरांना भेडसावणाऱ्या घरफोडीसारख्या गुन्ह्यंचे प्रमाण वसई, विरारमध्ये प्रचंड वाढले असल्याचेही दिसून येते. विशेष म्हणजे, नऊ महिन्यांच्या कालावधीत या शहरांत घडलेल्या ३०४ घरफोडींच्या घटनांपैकी अवघ्या ६९ गुन्ह्यंचा तपास पूर्ण करणे पोलिसांना जमले आहे.

जानेवारी ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत वसई, विरार या शहरांमध्ये हत्या, दरोडे, जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न, घरफोडी यांसारख्या जवळपास ४५० गुन्ह्यंची नोंद झाली. त्यापैकी जवळपास निम्म्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास पोलिसांनी पूर्ण केला. या कालावधीत शहरांत घडलेल्या ३२ हत्यांपैकी २५ हत्यांचा छडा लावून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, सात महत्त्वाच्या हत्या प्रकरणांत तपास अजूनही अंधारात आहे. यात वालीवच्या नवजीवन येथील महिला आणि तिच्या बाळाच्या दुहेरी हत्या, विरारमधील प्रसिद्ध तांदूळ व्यापाऱ्याची हत्या तसेच तुंगारेश्वर येथील जंगलात सापडेला महिलेचा मृतदेह अशा प्रकरणांचा समावेश आहे. अशोक शहा हे विरारमधील प्रसिद्ध व्यापारी होते. त्यांच्या चंदनसार येथील कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली आणि त्यांच्याकडील ८ लाख रुपयांची रोकड लुटून नेली होती. मात्र, त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध न लागल्यामुळे शहरातील व्यापारीवर्गात अजूनही धास्ती आहे.

cart

शहरातील घरफोडय़ा आणि चोरींचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरात जवळपास ४०० हून अधिक चोरी, घरफोडीच्या घटना घडल्या. त्यापैकी जवळपास १०० गुन्ह्यंचा तपास पोलिसांनी लावल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोनसाखळी चोरीच्या घटनेत घट झाली आहे. मात्र उकल होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली नाही. या वर्षी सोनसाखळी चोरीच्या ६१ घटना जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत घडल्या आहेत. त्यापैकी १५ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. २०१५ मध्ये याच काळात ९६ घटना घडल्या होत्या. मात्र त्यातील केवळ ३२ गुन्ह्यंची उकल झाली होती.

बलात्काराच्या ७५ घटनांची नोंद झाली असून त्यापैकी ७३ प्रकरणांतील आरोपींना अटक केली आहे. दोन बलात्कारांच्या गुन्ह्यंचा तपास अद्याप लागलेला नाही. विनयभंगाचे ९२ गुन्हे दाखल असून त्यापैकी ८८ गुन्ह्यंमध्ये आरोपींना अटक झाली आहे.

फरार आरोपी मोकाटच

  • पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या तीन आरोपींचा अद्याप शोध लागलेला नाही. विरारच्या स्कायवॉकवर एकाची हत्या करणारा महेंद्र पाल हा आरोपी वसई सत्र न्यायालयातून जून महिन्यात पसार झाला होता. एप्रिल महिन्यात त्याने दिवसाढवळ्या विरारच्या स्कायवॉकवर चाकूने भोसकून एकाची हत्या केली होती.
  • रिझवान मणियार (२८) हा आरोपी २२ ऑक्टोबर रोजी नालासोपारा पोलीस ठाण्याच्या कोठडीतून छतावरील पत्रे वाकवून पसार झाला होता. तो चोरी आणि घरफोडीच्या अनेक गंभीर गुन्हय़ांतील आरोपी होता.
  • तिसरा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात होता. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र अटक केली नव्हती. त्याला पोलिसांनी चहा बनवायला सांगितले आणि नंतर कचरा टाकण्यास सांगितले होते. तेव्हा तो पळून गेला. या आरोपीची कागदोपत्री नोंद नसल्याने या प्रकरणाचा गवगवा झाला नसल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

गुन्हे उघडकीस आणण्याबरोबर ते घडू नयेत यासाठी प्रयत्न करत आहोत. सोनसाखळी चोरीच्या घटनांचे प्रमाण रोखण्यात यश मिळवले आहे. उर्वरित सर्व गंभीर गुन्ह्यांचा तपास प्रगतिपथावर असून त्यांचीही लवकरच उकल होईल.

अनिल आकडे, विभागीय पोलीस उपअधीक्षक, वसई.