भोंगळ कारभारामुळे ठाणेकर प्रवाशांच्या नाराजीचा केंद्रिबदू ठरलेल्या ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाची प्रतिमा काहीही करा पण सुधारा असे आर्जव सत्ताधारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी उशिरा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे केले. महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना टीएमटीच्या नाराजीचा आयता मुद्दा विरोधी पक्षाच्या हाती लागू शकतो, अशी भीती शिवसेना नेत्यांना वाटू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर महापौर संजय मोरे यांनी बोलाविलेल्या एका बैठकीत टीएमटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली.

ठाणे तसेच आसपासच्या शहरांमधील प्रवासी सेवेची मागणी दिवसेंदिवस वाढत असूनही टीएमटीच्या नियोजनशून्य कारभारामुळे ही सेवा दिवसेंदिवस तोटय़ात जाऊ लागली आहे. मागील निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने टीएमटीच्या सक्षमीकरणाची मोठी आश्वासने ठाणेकरांना दिली होती. प्रत्यक्षात साडेचार वर्षांत टीएमटी सेवेचे तीनतेरा वाजले असून शिवसेनेलाही या आघाडीवर फारसे काही करून दाखविता आलेले नाही.

टीएमटीत सुरू असलेला सावळागोंधळ थांबला नाही तर प्रचारात विरोधकांच्या हाती आयता मुद्दा लागेल, अशी भीती आता सत्ताधाऱ्यांच्या गोटात व्यक्त होऊ लागली आहे. त्यामुळे काहीही करा टीएमटीची प्रतिमा सुधारा, असे आर्जव शिवसेनेचे महापालिकेतील पदाधिकारी जयस्वाल यांच्याकडे करू लागले आहे. सोमवारी सायंकाळी महापौर संजय मोरे यांच्या पुढाकाराने टीएमटी सेवा सुधारावी यासाठी एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.परिवहन सेवा सुधारण्यासाठी जास्तीत जास्त बसेस रस्त्यावर धावायला हव्यात. जेणेकरून नागरिकांमध्ये परिवहन सेवेविषयी जी नकारात्मक भूमिका आहे ती कमी होईल. त्यासाठी परिवहन सदस्यांपासून ते परिवहन व्यवस्थापक आणि कार्यशाळेतील प्रत्येक कर्मचारी यांनी पूर्ण क्षमतेने काम करावे अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. दरम्यान, परिवहन सेवा सुधारताना नागरिकांच्या सूचनांचा विचार करा. शेवटी ही सेवा त्यांच्यासाठीच असल्याने त्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करा असेही या वेळी आयुक्त आणि महापौरांनी उपस्थितांना बजाविले