अंबरनाथ नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे ते दिवस असल्याने संपूर्ण शहरात प्रचारफेऱ्या त्या दिवसांत निघत होत्या. मात्र याच काळात उल्हासनगरच्या आशा लूंड यांचा ३१ वर्षांचा रिक्षा चालविणारा मुलगा कमलेश वासवानी १३ एप्रिलला कामावर जातो सांगून घरी न आल्याने त्या फार चिंतेत होत्या. त्यांनी तीन-चार दिवस वाट पाहून आपल्या मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्या उल्हासनगरमध्ये शोध घेत असतानाच्या काळातच बाजूच्याच अंबरनाथ शहरात १९ एप्रिलला ऑर्डनन्स शस्त्रनिर्मिती कारखान्याच्या आवारात एका राजकीय पक्षाची प्रचारफेरी निघाली होती. ही फेरी येथील बंदर चौक, कामगार क्वार्टर या ठिकाणी येताच रॅलीतील अनिल माळी यांना बाजूच्याच एका नाल्याशेजारील दलदलीत मानवी शरीर दिसले, तेथे जाऊन खात्री करताच त्यांना एक मृतदेह दिसून आला. त्यांनी त्वरित त्याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्यात खबर दिली. अंबरनाथ पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बांबळे यांनी घटनास्थळी धाव घेताच त्यांनी मृतदेहाची पाहणी केली. मात्र पूर्णत: सडलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविणे मुश्कील झाले होते. मात्र प्रेताच्या उजव्या दंडावर इंग्रजीत पी.के. आणि त्याच हातावर एन.के. व क्रॉस चिन्ह गोंदलेले होते. ओळख न पटल्याने पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांत बेपत्ता असलेल्यांची नोंद तपासण्यास सुरुवात केली.
आपल्या मुलाचा शोध न लागल्याने आशा लूंड या आपले पती व कमलेशचे सावत्र वडील श्रीचंद लूंड व अन्य नातेवाईकांसह उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गेल्या. तिथे त्यांना एक मृतदेह अंबरनाथ हद्दीत सापडला असून तिथे चौकशी करा असे सुचविण्यात आले. अंबरनाथ पोलीस ठाण्यात पोहचताच त्यांना उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांना दाखविण्यात आलेला मृतदेह कमलेशचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचा मृतदेह पाहून त्या जागीच कोसळल्या. या प्रकरणाची पोलिसांनी तात्काळ चौकशी सुरू केली. कमलेशच्या सावत्र वडिलांनी सांगितले की, १३ एप्रिलला तो त्याचा मित्र संकेत मेढे याच्या रिक्षातून रात्री ११ वाजता त्याच्या ओळखीच्या आशा नावाच्या बाईला बंदर चौक, ऑर्डनन्स इस्टेट इथे सोडण्यास गेला होता. बंदर चौक, ऑर्डनन्स इस्टेट हा पत्ता कळल्यावर पोलिसांना एक गोष्ट कळून चुकली की, याच पत्त्यावर कमलेशचा मृतदेह मिळाला असून नक्कीच त्या रात्री त्या बाईला सोडल्यानंतर तिथ विपरीत काहीतरी घडले असणार.
पोलिसांनी आशा नावाच्या बाईचा शोध घेतल्यावर ती म्हारळ येथे राहात असल्याचे समजले. तिला गाठून पोलिसांनी तिच्याकडून हकीकत जाणून घेतली तर त्यातून पुढील धक्कादायक माहिती समोर आली. तिचे नाव आशा नागपुरे असून मुसलमान व्यक्तीशी लग्न केल्यावर तिचे नाव नसीमा खान झाले होते. पण या पतीने सोडल्याने ३० वर्षीय आशा आपली आई व दोन मुलांसह चंदन मिश्रा या रिक्षावाल्याच्या ओळखीने बंदर चौकातील कामगार क्वार्टर येथे राहात होती. चंदन मिश्राचे तिच्या घरी नेहमी येणे-जाणे चालू होते. तसेच ती १४ वर्षांपासून कमलेश वासवानीलाही ओळखत होती. त्यामुळे बऱ्याच दिवसांनी कमलेशला ती उल्हासनगरमध्ये दिसल्यावर कमलेश हा आपला मित्र संकेत मेढे याच्या रिक्षातून तिला सोडण्यास रात्री ११ नंतर तिच्या घरी गेला, त्यांना सोडून संकेत मेढे निघून गेला होता. यावेळी कमलेश तिच्या घरी जेऊन गप्पा मारत बसला होता. नेमके त्याच वेळी दारूच्या नशेत असलेले चंदन मिश्राचे गोटय़ा, लाडू, सोनू, बंटी, बाबू हे मित्र तिथे चंदन आहे का हे पाहायला आले. चंदन तेव्हा घरी नव्हता, मात्र चंदन घरी नसतानाही दुसरा पुरुष रात्री उशिरा घरात बसला हे पाहून त्याच्यावर संशय घेत त्या पाच जणांनी कमलेशशी वाद घालण्यास सुरुवात केली.
घरातील आशा व तिची आई यांना हा प्रकार काय चालला आहे ते कळेचना. कमलेशला ती मुले मारहाण करताहेत हे पाहून अखेर आशाची आई मध्ये पडली आणि तिने हा वाद सोडवला. त्यानंतर ही मुले निघून गेली. मात्र संतापाने डोकी भडकलेली ही मुले परत आली आणि त्यांनी कमलेशला बाहेर ओढून आणले आणि त्यास शिवीगाळ करत जबर मारहाण करत बंदर चौकात नेले. पोलिसांसमोरील चित्र या माहितीवरून स्पष्ट झाले. आता पोलिसांसाठी फक्त ते पाच जण पकडणे महत्त्वाचे होते. त्यामुळे पोलिसांची तपासचक्रे वेगाने फिरू लागली. उल्हानगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोनावणे यांच्या निर्देशांनुसार तपासाधिकारी पोलीस निरीक्षक सुनील घुगे व साहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बांबळे यांच्या पथकाने त्या पाच जणांचा शोध सुरू केला. पोलिसांनी चंदन मिश्राकडून त्यांची माहिती घेतली तर ते पाचही जण रंगारी असून विशीतले तरुण असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांचे पत्ते शोधत सगळ्यांना विश्वासात घेतले व अंबरनाथ पोलीस ठाण्यात आणले. यावेळी आणताना गोटय़ा म्हणजेच विश्वानंद ईनकर या वीसवर्षीय मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यालाही पकडून आणले. प्रत्येकाची वेगवेगळी चौकशी केल्यावर प्रत्येकाने कमलेशच्या खुनात सहभागी असल्याचे सांगितले.
गोटय़ा, जॉन ऊर्फ बेन्झिल फर्नाडिस, आतिष ऊर्फ सोनू आणि प्रदीप ऊर्फ बंटी बाविस्कर व बाबू यांनी कमलेशला मारहाण केल्यानंतर तो वाद आशा व तिच्या आईने मिटवला होता. मात्र नंतर रागाच्या भरात पुन्हा घरात घुसून त्यांनी कमलेशला बाहेर खेचून बंदर चौकातील नाल्याजवळ नेले. यावेळी या दोन्ही महिला व तिची मुले घाबरल्याने ते दार बंद करून झोपून गेले. मात्र कमलेशला शिवीगाळ व मारहाण करत या पाच जणांनी त्यावर चाकूने वार केले. त्याच्यावर दगडानेही वार करण्यात आले. गतप्राण झालेल्या कमलेशला नाल्याच्या बाजूच्या दलदलीत टाकून त्यांनी पोबारा केला होता. निव्वळ दारूच्या नशेत संशयावरून या विशीतल्या तरुणांनी एकाची हत्या केली होती.