बोईसर येथील टिमा रुग्णालय येथे नऊ तर डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालय येथील एक व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांच्या उपस्थित त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजून कोरोनामुक्त झालेल्यांचे अभिनंदन केले.

पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये करोनाचे २७ रुग्ण आढळून आले होते त्यापेकी दोघांचा मृत्यू झालेला असून एका महिलेला ठाणे सिव्हिल हॉस्पिटल येथून या पूर्वी सोडण्यात आले आहे. २६ एप्रिल रोजी तीन वर्षीय मुलगी कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले होते. या मुलीच्या संपर्कात आल्यामुळे काटाळे येथील पाच व रानशेत येथील चार जणांना तसेच उपजिल्हा रुग्णालय कासा येथील दोन शिकाऊ डॉक्टरांना करोनाची लागण झाली होती.

तसेच शिकाऊ डॉक्टरांच्या संपर्कात आल्याने एका प्रसुती झालेल्या मातेला कोरोनाची लागण झाली होती. या सर्वानी कोरोनाशी दोन हात करत कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. यापैकी दहा रुग्णांचा १२ व्या व १३ व्या दिवशी घेण्यात आलेल्या Swab चा अहवाल निगेटिव्ह आला असल्याने व त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज टिमा रुग्णालय बोईसर येथून नऊ व उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथील दाखल एका मातेला जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वनारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात व उत्साहवर्धक वातावरणात डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी सर्व उपस्थितांना व १४ दिवस रुग्णालयात रुग्णांची सेवा करणाऱ्या रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्सेस व इतर कर्मचारी यांना गहिवरून आले व भावनिक वातावरण निर्माण झाले. पालघर जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय कार्यान्वित नसताना देखील जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खाजगी रुग्णालय अधिग्रहीत करून कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्यात आले व जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या अथक प्रयत्नाने आज हे सर्वजण कोरोनामुक्त होऊन आपआपल्या घरी गेले ही बाब जिल्हयासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र केळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित खंदारे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ . सागर पाटील, डॉ. वाणी आणि डॉ. शिंदे तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.