ठाणे जिल्हा कृषी विभागाने बांधले ८४४ बंधारे;  सहाशे एकर जमीन ओलिताखाली

यंदा सरासरी ७० टक्केच पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे काय होणार ही चिंता सगळीकडे व्यक्त केली जात असली, तरी ठाणे जिल्ह्य़ातील सुमारे सव्वा तीनशे गावातील शेतकऱ्यांना याची झळ पोहचणार नाही. ठाणे जिल्हा कृषी विभागाने बांधलेल्या ८४४ वनराई बंधाऱ्यांमुळे हे चित्र निर्माण झाले आहे.

या पाण्यामुळे गावांमधील शेतकऱ्यांनी सुमारे ६२५ एकर क्षेत्रावर भाजीपाला आणि कडधान्याची लागवड केली आहे. या वनराई बंधाऱ्यांमध्ये ५०० टी. सी. एम. पाणी साठल्यामुळे परिसरातील विहिरी व बोअरवेलमधील पाण्याच्या पातळीतही वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली मोठी जमीन आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांना आणि कुटुंबीयांस वापरासाठीही मुबलक पाणी उपलब्ध झाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्हय़ाचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान २४४२ मि. मी. आहे. यावर्षी १७३९.५० मि. मी. पाऊस पडला आहे. म्हणजेच सरासरी ७०% पाऊस पडला. त्यामुळे काही गावात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता निर्माण झाली. रब्बी हंगामात भाजीपाला व कडधान्य पिकांची मोठय़ा प्रमाणात लागवड होत असते. भाजीपाल्यास तसेच कडधान्य पिकास संरक्षित सिंचनाची अत्यंत गरज भासते. संरक्षित सिंचनामुळे कडधान्य पिकाचे उत्पादनही वाढते ही बाब विचारात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची धडक मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कृषी विभागाने स्थानिक लोकप्रतिनिधी, गृहनिर्माण संस्था, शेतकरी यांचा सहभाग मिळवून बंधारे बांधण्याचे काम सुरू केले. गेल्या तीन-साडेतीन महिन्यात ३२३ गावांमध्ये ८४४ वनराई बंधारे बांधण्यात आले. अनेक गावामधील शेतकरी बांधलेल्या वनराई बंधाऱ्यावर भेंडी, काकडी, मिरची, ढोबळी मिरच्यांची पिके मोठय़ा प्रमाणात घेत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभागाचे अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार अशा सर्व अधिकाऱ्यांनीदेखील ग्रामीण भागात जाऊन श्रमदानातून बंधारे बांधले. शहापूर तालुक्यातील वांद्रे, तर मुरबाड तालुक्यातील वालिवरे गावात कृषी विभाग, महसूल विभाग व गावकऱ्यांच्या सहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले.

या बंधाऱ्यामुळे आम्ही दुबार पीक व भाजीपाला पिके घेऊ  शकलो, अशा भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत, असे कृषी अधीक्षक महादेव जंगटे यांनी सांगितले.