आदिवासी महिलांना रोजगार; किंमत प्रत्येकी ३० रुपये

बहीण-भावाच्या नात्याला घट्ट करणारा रक्षाबंधन हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच वसई-विरारच्या बाजारपेठांमध्ये बांबूपासून बनवलेल्या राख्या दाखल झाल्या आहेत. पर्यावरणपूरक असलेल्या या राख्यांची निर्मिती आदिवासी महिलांनी केली असून त्यांच्यामार्फत त्यांना रोजगार मिळत आहे. या राख्यांची किंमत प्रत्येक ३० रुपये आहे.

आदिवासी, गरजू महिलांना घरकाम सांभाळून आर्थिक हातभार लाभावा या हेतूने विवेक राष्ट्रसेवा समिती या संस्थेने पुढाकार घेत अशा महिलांना बांबू हस्तकलेचे मोफत प्रशिक्षण दिले. सध्या संस्थेमार्फत प्रशिक्षणाचे १२ वर्ग चालवण्यात येत असून यामध्ये अनेक प्रकारच्या बांबूच्या वस्तूंसह राख्यांच्या निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षण वर्गातून आतापर्यंत १५०हून अधिक महिलांना बांबूच्या वस्तूंसह बांबूच्या राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामध्ये ८०हून अधिक महिलांनी घरच्या घरीच लघुउद्योग थाटला असून या महिलांना महिन्याला पाच हजार ते आठ हजार रुपये रोजगार मिळत आहे.

बांबूच्या राख्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य, नैसर्गिक रंग हे सर्व संस्थेकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आले असून आदिवासी महिलांनी पाच विविध प्रकारच्या राख्या बनवल्या आहेत. विशेष म्हणजे या राख्यांची विक्री केंद्रही उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पालघर जिल्ह्यातील आदिवासी, गरजू महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने बांबूपासून राख्या बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या राख्या खरेदी करून आदिवासी महिलांना प्रोत्साहित करावे.

-प्रगती भोईर, विवेक राष्ट्रसेवा समिती.