tvlogअलिबाबा आणि चाळीस चोर, निम्माशिम्मा राक्षस, शेपटीचा शाप इ. नावे वाचताना बालपणीच्या सुखद स्मृतींनी मन आनंदित होते. कारण भरभरून आनंद देणाऱ्या अशा अनेक बालनाटकांनी तुम्हाआम्हा सर्वाच्या भावविश्वाचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकला आहे. मराठी माणूस हा नाटकप्रेमी म्हणून ओळखला जातो. पण खरंतर बालनाटकांमुळे त्याची नाटकाशी नाळ जोडली जाते आणि काळाच्या ओघात हे नाते अधिकच दृढ होत जाते.
महाराष्ट्रातील पिढय़ा घडवण्यात बालनाटय़ांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण मनोरंजनाच्या माध्यमातून उत्तम संस्कार करण्याचे, (जडणघडणीच्या काळात) चांगल्या आचाराविचारांची बीजे पेरण्याचे काम बालरंगभूमी गेली ५५ वर्षे करीत आहे.
नाटक हे केवळ मनोरंजनाचेच नव्हे, तर शिक्षणाचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. ज्या शाळांमध्ये नाटक शिकवले जाते त्या शाळेतील मुलांची भाषा अधिक चांगली असते, असे निरीक्षणाअंती दिसून आले आहे. नाटक या माध्यमाचे हे सामथ्र्य लक्षात घेऊनच २००५ सालच्या भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक आराखडय़ात नाटक विषयाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. नाटक हा विषय शाळेत शिकवला जावा अशी शिफारस त्यात करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक असा इ.१ली ते इ.१०वी पर्यंतचा पाठय़क्रमही  तयार करण्यात आला आहे. पण तरीही ९९% शाळांत आजही नाटक शिकवलं जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. कित्येक पालक, विद्यार्थी यांना हे माहीतही नाही. युरोप, अमेरिका इ. देशांत मात्र बालनाटय़ाचे शिक्षण शाळेत आवर्जून दिले जाते.
नाटक ही एक कला आहे. पण बालकांसाठी तो एक छानसा खेळ असतो. नाटक खेळता खेळता मुले अनेक नवीन शब्द शिकतात. वाक्प्रचार/ म्हणी/ उपमा यांचा उपयोग त्यांना कळू लागतो. शब्दांचे सामथ्र्य कळू लागते, उच्चाराचे महत्त्व कळते, संवाद बोलताना स्वल्पविराम, पूर्णविराम योग्य वेळी घेतल्याचे फायदे कळतात आणि त्यामुळे शब्दांचे, वाक्यांचे अर्थ कसे बदलतात ते समजते. बालनाटय़ामुळे मुलांची भाषेची जाण समृद्ध होण्यास मदत मिळते. अभ्यासकांच्या मते, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि भाषिक प्रगती साध्य करण्यासाठी नाटक ही कला साहाय्य करते. बालनाटय़ांमुळे मुलांचा भावनिक, मानसिक, भाषिक, बौद्धिक विकास साधला जातो.
बालनाटय़ाप्रमाणे बाहुलीनाटय़, मुखवटानाटय़, जादू, श्ॉडो थिएटर, मास्क थिएटर, ग्रीप्स थिएटर, मायनिंग इ. बालरंगभूमीचे वैविध्यपूर्ण कलाविष्कार आहेत आणि त्यांनी बालरंगभूमीला समृद्ध केले आहे. आपल्या देशात बालरंगभूमीचा या दृष्टीने परिचय करून देताना अधिकाधिक विस्तार आणि विकास होण्याच्या व्यापक उद्दिष्टाने बालरंगभूमी नियामक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. चिल्ड्रेन्स थिएटर अकादमी आणि बालरंगभूमी नियामक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने देशातील पहिले ‘बालरंगभूमी संमेलन’ ठाण्यात संपन्न होणार आहे. आपल्या देशात बालनाटय़ांचे सर्वाधिक प्रयोग ठाण्यात होतात ही गोष्ट विशेषत्वाने नमूद करण्याजोगी म्हणूनच हे पहिले बहुभाषी बालरंगभूमी संमेलन ८ मे रोजी डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात आयोजित करण्यात आले आहे. याला जोडूनच ९ व १० मे रोजी बालरंगभूमी महोत्सवाअंतर्गत मराठी/ हिंदी/ इंग्रजी बालनाटय़ांबरोबर नृत्यनाटय़, मुखवटानाटय़, बोलक्या बाहुल्या/ कळसूत्री बाहुल्यांचे प्रयोग, जादू, माइम, श्ॉडो शो इ. प्रयोग मुलांना अनुभवता येणार आहेत. येथे नामवंत कलाकार आपली कला सादर करणार असले तरी स्थानिक बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देणारे कार्यक्रमदेखील होणार आहेत.
कार्यक्रमाची धुरा गेली ३० वर्षे बालरंगभूमी क्षेत्रात कार्यरत असलेले राजू तुलालवार सांभाळत असून त्यांना शालेय रंगभूमी, अभ्यासनाटय़ यांचा विशेष अभ्यास असलेले प्रकाश पारखी, प्रसिद्ध रंगभूषाकार व मुखवटाकार प्रभाकर भावे, बालनाटय़ अभ्यासक डॉ. मनीषा बर्वे, बालनाटय़ संयोजक मनीषा ढापरे, बाहुली नाटय़तज्ज्ञ कल्पना गवरे हे रंगकर्मी मोलाचे सहकार्य करीत आहेत.
बालरंगभूमीची व्याप्ती खूप मोठी आहे आणि या क्षेत्राशी निगडित विविध माध्यमांतील रंगकर्मी आपापल्या परीने कार्यरत आहेत. या सर्व रंगकर्मीनी वर्षांतून किमान एकदा भेटावे, आपल्या कार्याचा परिचय इतरांना करून द्यावा आणि परस्पर सहकार्याने बालरंगभूमी अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न व्हावा असे व्यापक उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हे संमेलन आयोजिण्यात आले आहे.
बालनाटय़ांचा विचार केला तर व्यावसायिक बालनाटय़, शालेयनाटय़, शिबीरनाटय़, अभ्यासनाटय़, खेळनाटय़ इ. विविध प्रकारे बालनाटय़ सादर होतात. प्रत्येकाचा रंगमंच, कार्यपद्धती आणि उद्देश वेगवेगळा असून तो रंगकर्मीनी नेमका समजून घ्यावा या दृष्टीने संमेलनात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
जागतिकीकरण, मुक्त अर्थव्यवस्था, मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सचा वाढता वापर, आधुनिक जीवनशैली, गुणांची जीवघेणी स्पर्धा आणि मुलांचा व्यस्त दिनक्रम, पालकांमुळे यांची बदलती मानसिकता यामुळे बालनाटय़ क्षेत्रासमोर नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत. व्यावसायिक गणिते सांभाळणे या मोठय़ा आव्हानाला सामोरे जाताना व्यावसायिक बालनाटकांची संस्था हळूहळू कमी होऊ लागली. (कारण संख्या कमी होऊ लागल्या.) बालनाटय़ांचे अस्तित्व उन्हाळी आणि दिवाळी सुट्टीच्या काळात प्राधान्याने दिसून येऊ लागले. गुणांच्या/ अभ्यासाच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे ही नाटके ४ ते १० वर्षांपर्यंतच्या मुलांपुरतीच मर्यादित होऊ लागली. पण तरीही आज ठाणे-मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक इ. ठिकाणी रंगकर्मी आपापल्या परीने निष्ठेने ही बालनाटय़ाची, बालरंगभूमीची धुरा सांभाळत आहेत.
अशा टप्प्यावर बालरंगभूमी संमेलन यांसारखा उपक्रम ही काळाची गरज आहे. मुलांमधील विविध गुणांना, सर्जनशीलतेला खऱ्या अर्थाने विकसित करण्यासाठी ‘नाटक’ हे प्रभावी माध्यम आहे. आणि मुलेदेखील सहजतेने, आनंदाने या माध्यमाचा स्वीकार करतात. त्यामुळे या संमेलनातून हा विचार उपस्थितांपर्यंत पोचवला जाईल आणि शाळा या दृष्टीने काही बदल करू पाहतील अशी आशा करायला हरकत नाही.  शाळा शाळांचे व्यवस्थापक, शिक्षक-पालक हे अशा तऱ्हेच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी आशा करायला हरकत नाही.
 हेमा आघारकर