सोसायटीचे बनावट शिक्के तयार करुन त्या माध्यमातून बोगस कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी वसईमधील सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील दोघांनी बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून बँकांकडून कर्जदेखील घेतले होते. या प्रकरणात सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने सहा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

वसईमधील स्विफ्ट सहारा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे समिती सदस्य असलेल्या चंद्रकांत कदम यांनी बोगस कागदपत्रांप्रकरणी वसई न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर न्यायालयाने सोमनाथ विभुते, सुधाकर कापसे, सचिन कापसे, सर्वजित तिवारी, चुडामन पाटील आणि चंद्रकांत दावडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. या सहाजणांनी संस्थेच्या समितीची परवानगी नसताना बनावट शिक्के तयार करुन त्याचा गैरवापर केला. बनावट शिक्क्यांच्या माध्यमातून या ठकसेनांनी गृहनिर्माण संस्थेचे बनावट ना-हरकत प्रमाणपत्र तयार केले. यानंतर सुधाकर कापसे आणि सचिन कापसे यांनी या कागदपत्रांच्या आधारे आयसीआयसीआय बँकेतून १४ लाख रुपयांचे कर्जही घेतले. या बनावट कागदपत्रांचा वापर इतरही ठिकाणी केला असण्याची शक्यता आहे.

गृहनिर्माण संस्थेचे बनावट शिक्के बनवण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस येताच वसईत एकच खळबळ उडाली. या गुन्ह्याची व्याप्ती अतिशय मोठी असल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. यामुळे सहकारी संस्थांमध्ये चाललेली व्हाईट कॉलर गुन्हेगारी समोर आली आहे. या बनावट शिक्कांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या बोगस कागदपत्रांचा वापर नेमका कुठे आणि कशा पद्धतीने करण्यात आला, याचा तपास आता पोलीस निरीक्षक सागर टिळेकर करत आहेत.