स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत ठाणे, कल्याण तीनशेपार

जागोजागी पडलेला कचरा, पानतंबाखूच्या पिचकाऱ्या, अस्वच्छ स्वच्छतागृहे, दरुगधी हे चित्र वर्षांनुवर्षे कायम असलेल्या ठाणे आणि कल्याण या मध्य रेल्वेवरील महत्त्वाच्या स्थानकांतील अस्वच्छतेवर आता रेल्वे मंत्रालयानेच शिक्कामोर्तब केले आहे. देशभरातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांच्या स्वच्छता मानांकनात ठाणे ३२६व्या तर कल्याण ३०२व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. खासगी संस्थेचे परीक्षण, नागरिकांची मते आणि थेट पाहणी अशा तीन टप्प्यांच्या आधारे करण्यात आलेल्या या स्वच्छता पाहणीत या दोन्ही स्थानकांच्या बकालपणावर शिक्कामोर्तब झाले आहे.

chart

देशभरातील रेल्वेस्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी करण्याचे काम रेल्वे मंत्रालयाने एका खासगी संस्थेला दिले होते. त्याखेरीज या स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी नोंदवलेली मते आणि प्रत्यक्ष पाहणी अशा तीन माध्यमांतून एक हजार गुणांपैकी मिळालेल्या गुणांनुसार स्थानकांची क्रमवारी निश्चित करण्यात आली. या क्रमवारीत ठाणे स्थानक ३२६व्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले. या स्थानकाला एकूण एक हजारपैकी ५६५ गुण मिळाले. तर ३०२वा क्रमांक मिळवणाऱ्या कल्याण जंक्शनला १ हजारपैकी ५८५ गुणच मिळवता आले. दोन्ही रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांनी स्वच्छतेबाबत  कल्याण रेल्वे स्थानकाला १८५ गुण, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी २०१ गुण (एकूण गुण ३३३) दिले आहेत. यावरून या दोन्ही स्थानकांतील अस्वच्छतेचा प्रश्न उघडय़ावर आला आहे. विशेष म्हणजे, ठाणे रेल्वे स्थानकाला जागतिक दर्जाचे स्थानक बनविण्याची घोषणा काही वर्षांपूर्वी रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानुसार या स्थानकात सरकत्या जिन्यांसारख्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. असे असताना अत्यंत अस्वच्छ स्थानकांमध्ये ठाण्याचा समावेश झाल्याने येथील प्रवाशांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मध्य रेल्वेमार्गावरील सर्वाधिक गर्दीची स्थानके अशी ठाणे आणि कल्याणची ओळख आहे. रेल्वे प्रशासनाच्या एका अहवालानुसार ठाणे स्थानकातून दररोज सहा लाख तर कल्याणमधून पाच लाखांपेक्षा अधिक प्रवासी दररोज प्रवास करत असतात. तिकीट विक्रीतून कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न या स्थानकांमधून रेल्वेच्या तिजोरीत जमा होत असते. असे असताना या दोन्ही रेल्वे स्थानकांची स्वच्छता ठेवण्यात स्थानिक रेल्वे प्रशासन पूर्णपणे अपयशी, निष्क्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.