कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत सर्व पक्ष, अपक्षांकडून पैशाचा किती वापर होतो आहे; तसेच कोण किती उधळपट्टी करतोय आणि मागील पाच वर्षांत कोणी किती आर्थिक प्रगती साधली या हालचालींवर प्राप्तिकर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बारकाईने लक्ष ठेवले आहे.

कल्याण-डोंबिवलीतील अनेक नगरसेवकांनी उद्योगधंद्यांच्या माध्यमातून, समाजकार्य करत आपापल्या विभागात स्थान निर्माण केले आहे. यानंतर कल्याण- डोंबिवलीला महापालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
मागील वीस वर्षांपूर्वी पाच ते १० लाखांचे धनी असलेले काही नगरसेवक आता कोटय़वधींच्या मालमत्तांचे मालक बनले आहेत. अशा नगरसेवकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे. यावर प्राप्तिकर विभागाने नजर ठेवली आहे.
मालदार उमेदवार
शरद गंभीरराव (माजी उपमहापौर)

सभागृहनेते अशी पदे भूषवलेले शरद गंभीरराव डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक ८२ अंबिकानगर येथून मनसेचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
’शिक्षण – एस.एस.सी. (नूतन विद्यालय किन्हिवली १९७३)
’व्यवसाय – सिव्हिल वर्क्‍स
’गुन्हे – सरकारी कामात अडथळा, बेकायदा जमावामध्ये सहभागी होणे, दंगल करणे, सार्वजनिक शांततेचा भंग, प्रक्षोभक वक्तव्य, मालमत्तेचे नुकसान करणे असे १५ गुन्हे कल्याण न्याप्रविष्ट
’पत्नी – कल्याण-डोंबिवली महापालिकेमध्ये लिपिक म्हणून कार्यरत.
’वार्षिक उत्पन्न – ५ लाख ८ हजार ६१३
’पत्नीचे उत्पन्न – ५ लाख ९२ हजार ३४६
’जंगम मालमत्ता – १५ लाख ९७ हजार ७४१
’पत्नीची मालमत्ता – १९ लाख ८१ हजार
’स्थावर मालमत्ता – १ कोटी २७ लाख ५० हजार

कैलास शिंदे (माजी गटनेते)

शिवसेनेचे माजी गटनेते असलेले कैलास शिंदे प्रभाग क्रमांक १०७ पिसवली येथून शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत.
’शिक्षण – पदवीधर (सी.एच.एम. महाविद्यालय, उल्हासनगर, १९८७)
’व्यवसाय – नोकरी
’वार्षिक उत्पन्न – ७ लाख ८ हजार ७६०
’जंगम मालमत्ता – १० लाख ९० हजार ५२०
’पत्नीची मालमत्ता – ९ लाख ९६ हजार
’स्थावर मालमत्ता – ७४ लाख १२ हजार
’पत्नीची मालमत्ता – ३१ लाख ९९ हजार ६००
’कर्ज – २० लाख

लक्षवेधी लढती

खडकपाडा (प्रभाग क्र. १८ )

तिरंगी लढत

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा प्रभाग हा नोकरदार, सुशिक्षित वर्गाची वस्ती असलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागात खानदेशी समाज अधिक संख्येने आहे. या भागातील मिश्र वस्तीचा मतदार या प्रभागातील उमेदवाराचे भवितव्य ठरवतो. मागील पाच र्वष शिवसेनेचे रवींद्र पाटील यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले. यावेळी पाटील यांचे नातेवाईक योगेश पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. भाजपतर्फे अर्जुन भोईर, मनसेतर्फे नगरसेवक उल्हास भोईर निवडणूक रिंगणात आहेत.

एकतानगर (प्रभाग क्र. ८० )

विकासकामे की उमेदवार

एकतानगर प्रभागात मनसेचे नगरसेवक राजन मराठे यांच्या पत्नी ज्योती, भाजपच्या प्रतीक्षा पवार, शिवसेनेच्या शुभदा देसाई, काँग्रेसच्या दीप्ती दोषी निवडणूक लढवत आहेत. मागील पाच र्वष मनसेचे नगरसेवक राजन मराठे यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले. महापालिकेबरोबर स्वत: यंत्रणा उभारून प्रभाग आदर्श राहील याची काळजी घेतली. त्यामुळे स्वच्छता अभियानाचा पुरस्कार या प्रभागाला मिळाला आहे. या प्रभागात तिरंगी लढत होणार आहे.

अंबिकानगर (प्रभाग क्र. ८२)

तुल्यबळ उमेदवारांमध्ये चुरस

विकासकामे करा तरच मते देतो अशा प्रकारची विचारसरणी असलेला हा प्रभाग आहे. कधी शिवसेना तर कधी मनसे असे आलटून पालटून नगरसेवक या प्रभागातून निवडून गेले आहेत. मनसेकडे या प्रभागाचे नेतृत्व आहे. त्यापूर्वी शिवसेनेचे वर्चस्व होते. यावेळी मनसेतर्फे नगरसेवक शरद गंभीरराव, भाजपतर्फे महेश पाटील तर शिवसेनेतर्फे भाऊसाहेब चौधरी असे तुल्यबळरिंगणात आहेत.