26 January 2021

News Flash

पाना-फुलांनी सजलेल्या गौराईच्या आगमनाची चाहूल

गौरीनिमित्त विविध फुलांची आरास; आदिवासींना आर्थिक उत्पन्नाचा लाभ

गौरीनिमित्त विविध फुलांची आरास; आदिवासींना आर्थिक उत्पन्नाचा लाभ

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू : गणपतीपाठोपाठ रानावनातील पानाफुलांनी सजणाऱ्या गौराईच्या आगमनाची चाहूल भाविकांना लागली आहे. सोमवारपासून  गौराई पूजकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ग्रामीण भागात गौरी सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. विविधसमाजांत गौरी पूजन वेगवेगळ्या प्रथा-परंपरांनी केले जाते. गौरी पूजनात रानफुलांचे महत्त्व अबाधित आहे. जंगलात, माळात फिरून रानफुले गोळा करून त्यांची विक्री केली जाते. या विक्रीतून आदिवासी महिला, पुरुषांना आर्थिक उत्पन्नाचा लाभ होतो. मुंबई, ठाणे, वसई, बोरिवली येथे बाजारात रानफुले विक्रीसाठी संध्याकाळी रेल्वे फलाट, बस स्थानक, खाजगी वाहनतळ या ठिकाणी गौरीनिमित्त कष्टकरी वर्गाची लगबग पाहायला मिळते.गौरी पूजनात  ईंदयची फुले, दौडे, पेवे आदी रानझाडे, फुले आणि वनस्पती यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या फुलांचा आरस बसवला जातो. गौराय मातेचे रूप आणि पूजन हे फक्त रानफुले आणि झाडांवरच अवलंबून असल्याने त्यामुळे शहरात जाऊन स्थायिक झालेल्या रहिवाशांना साहित्यासाठी गावाहून साहित्य घेऊन येणाऱ्या रानफुले विक्रेत्यांवर अवलंबून राहावे लागते. गावातून मोठय़ा प्रमाणात लोक शहरात स्थलांतरित झाले असले तरी गौरी पूजनाच्या परंपरेला आधुनिक रूप न देता पारंपरिक पद्धतीने रूढीपरंपरेने गौरी पूजन केले जाते आहे.

त्यामुळे शहरात स्थायिक झालेल्या रहिवाशांना आणि गौरी उपासकांना पूजनासाठी ग्रामसंस्कृतीवर पर्यायाने रानफुलांवरच अवलंबून राहावे लागते. आदिवासी समाजात वारली तर मच्छीमार समाजात मांगेला पोटजातीत गौर बसवली जात नाही. त्यामागे काही आख्यायिका असल्याचे बोलले जाते.

डहाणू, तलासरी, पालघर, वसई, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या तालुक्यांत गौरीच्या आगमनापूर्वी पंधरा ते एक महिना आधीपासून गौरी गीतांवर उत्साही तरुण रात्री घरोघरी नाचतात.

रात्री उशिरापर्यंत गौरी नाच, ढोल नाच, तारपा नाच, गौरी गीतांवर आधारित खास गौरी  नाच नाचवला जातो. शेतीची कामे संपल्याने थकव्यातून विरंगुळा घेण्यासाठी शेतकरी वर्ग, सुवासिनी मोठय़ा उत्साहाने गौरी सण साजरा करताना दिसतात. शेतातली धवलेरी फळण्यासाठी देवीला गाऱ्हाणी घालतात.

पूजनाची पद्धत

गौरी पूजनाच्या एक दिवस आधी गौरी घराच्या बाहेर आणून ठेवली जाते. गौरी आणणाऱ्या व्यक्तीच्या कानात सुवासिनी फूल अडकवते. प्रत्येक ठिकाणी त्याची वेगवेगळी परंपरा जपली जाते.

पूजनाच्या दिवशी रानफुलांपासून विशिष्ट आकारात चुलीजवळ तर काही ठिकाणी पाट, खुर्ची अथवा बाकावर बसवून रानफुलांनी देवीची प्रतिकृती बनवली जाते. सुवासिनी गौराय देवीला नाकाची नथ, मंगळसूत्र,ल बांगडय़ा आणि दागिने व सौभाग्यलंकारांनी सजवतात. रानातून आलेल्या गौराय मातेच्या स्वागतासाठी सुवासिनींच्या उत्साहाला भरती आलेली असते. गौराय मातेचे आगमन सायंकाळी होते. घराच्या ओटय़ापासून ते घरातल्या सर्व खोल्या, स्वयंपाकाची खोली, गोठा ते चुलीपर्यंत तांदळाच्या पिठाने भरलेल्या ठशांनी चालवली जाते. देवीच्या पावलांना कुंकू आणि हळदीची बोटे लावून सुवासिनींनी मातेची पावले चालवण्याची प्रथा आजही परंपरेने चालवली जात आहे.

गौराय मातेची पावले घराच्या प्रत्येक खोलीत चालवली जातात. प्रथेनुसार गौराय मातेला खाडी, जंगल आणि समुद्रातून मिळणाऱ्या मासळीच्या भाजीचा नैवेद्य द्यावा लागतो.  यामध्ये कोलंबी, खेकडे, लहान मासे यांपासून तयार केलेल्या भाजीचा नैवेद्य दिला जातो. गौरी ज्या दिवशी वस्तीला राहते ती रात्र नाचून जागवली जाते. दुसऱ्या दिवशी गौराय मातेला मोठय़ा मनाने निरोप देण्यासाठी महिलांचा मेळा जमलेला असतो. शेतातून जाणारा वाहता नाला, नदी-ओठय़ात गौराय मातेचे विसर्जन केले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 1:40 am

Web Title: income to tribals from sale of flowers during gauri worship zws 70
Next Stories
1 ठाणे जिल्ह्य़ात ८५९ नवे रुग्ण
2 खात्री पटल्यानंतरच निर्बंधांत आणखी शिथिलता
3 वसईत करोनाबाधितांच्या संख्येत घट
Just Now!
X