आतापर्यंतच्या लेखात सांगितल्याप्रमाणे कुंडीत झाडं लावून गृहवाटिकेचा आनंद आपण घेऊ लागलो की, गृहवाटिकेसंबंधी आणखी काही गोष्टी माहीत असणं, करता येणं आवश्यक आहेत. त्यातील काही पुढे देत आहे
झाडांची कुंडी बदलणे
झाड आणि कुंडी यांचं प्रपोर्शन चांगलं दिसण्यासाठी लहान झाडासाठी लहान कुंडी वापरणं अपेक्षित आहे. मात्र, जेव्हा झाड मोठं होतं तेव्हा ते मोठय़ा कुंडीत हलवायची गरज भासते. लोखंडी पट्टीच्या साहाय्याने आपण लहान कुंडीतलं झाड मोठय़ा कुंडीत लावू शकतो.
कुंडी बदलण्यासाठी, लहान कुंडीतील झाडाला सर्व बाजूने पाणी घालून माती ओली करावी. कुंडीमधील माती कुंडीपासून अलग करण्यासाठी, कुंडीच्या कडेकडेने लोखंडी पट्टी कुंडीत खुपसावी आणि माती कुंडीपासून अलग करावी. झाडाच्या सर्व बाजूने माती कुंडीपासून अलग झाल्यावर, झाडाला त्याच्या बुंध्यापाशी धरावे आणि झाड अगदी हळूहळू वर उचलावे. माती जर सर्व बाजूंनी मोकळी झाली असेल तर झाड सहज वर उचललं जाईल. नसल्यास, जो भाग अडथळा निर्माण करीत असेल त्या भागातील माती कुंडीपासून अलग करावी. आता, झाड उचलल्यास, मुळांना चिकटलेल्या मातीसकट झाड बाहेर काढता येईल.
ज्या मोठय़ा कुंडीत झाड लावायचं आहे, त्या कुंडीत खाली नारळाच्या शेंडय़ांचा थर द्यावा. त्यावर माती-कंपोस्ट या मिश्रणाचा भर द्यावा आणि छोटय़ा कुंडीतून बाहेर काढलेले झाड मध्यभागी ठेवावे. झाडाच्या सर्व बाजूंनी माती घालावी आणि त्यावर पाणी घालावे. माती घालून ती चेपू नये. पाण्यामुळे माती खाली बसेल. त्यामुळे परत माती घालावी आणि पाणी घालावे. अशा प्रकारे या मोठय़ा कुंडीचा १/४ भाग मोकळा राहील इतपतच माती घालावी. ‘कुंडी भरणे’ या लेखात याचे वर्णन यापूर्वी आले आहे. कुंडीचा १/४ भाग का मोकळा ठेवला आहे, हेही आपणास आता लक्षात आले असेलच.
अशा प्रकारे एका कुंडीतलं झाड दुसऱ्या कुंडीत सहजपणे हलवता येतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फुलं काढणे
झाडावरून फुलं/ पानं काढताना हळुवारपणे काढावीत. ज्या फांदीवरचं फूल/ पान काढायचं असेल, ती एका हाताने धरून दुसऱ्या हाताने फूल/ पान काढावे, म्हणजे सर्व झाडाला धक्का बसत नाही. जोरात ओढून कधीही काढू नये. प्रत्येक फुलाची एक खासियत असते-
* जास्वंदीच्या फुलाच्या मागे देठाला एक छोटासा बाक असतो, त्या पॉइंटवर तोडल्यास फूल चटकन तुटते.
* गुलाबाच्या देठावर थोडय़ा अंतरावर जरा फुगीरपणा असतो. त्या पॉइंटवर गुलाबाचं फूल तोडल्यास ते पटकन तुटते.
* अबोलीचे फूल काढताना पाकळ्यांच्या अगदी जवळ धरून ओढले तर फक्त पाकळ्याच हातात येतात. त्यामुळे अबोलीचे फूल काढताना ते पाकळ्यांपासून दूर, देठाला धरून काढावं.
* गुलबक्षीचं फूल ओढलं तर परागकण आणि त्या खालचा ‘मणी’ झाडावरच राहतं, त्यामुळे गुलबक्षीचे फूल काढताना ते मण्यासकट काढावं. मणी आणि परागकणांसकट फूल जास्त छान दिसतं.
* सोनटक्क्याचं फूल काढताना पाकळ्यांपासून जास्तीत जास्त दूर देठाला धरून फूल काढावं. इथे कणसामध्ये देठ घट्ट बसलेलं असतो. इ.

गृहवाटिका आकर्षक दिसण्यासाठी
* वेळोवेळी झाडाची छाटणी करून तसेच कुंडी बदलून कुंडी आणि झाड हे नेहमी प्रमाणबद्ध असावेत.
* एकमेकांशेजारील कुंडय़ासारख्या आकाराच्या असाव्यात.
* फुलं आलेली झाडे किंवा आकर्षक पानांची झाडे सहज दिसतील अशा प्रकारे कुंडय़ांची रचना असावी. यासाठी रचना वेळोवेळी बदलावी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase beauty of the garden
First published on: 07-05-2016 at 03:23 IST