५२ दिवसांवरून ३२३ दिवसांवर

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८४ टक्क्यांवर पोहोचले असतानाच करोना रुग्ण दुपटीच्या कालावधीमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण दुपटीचा कालावधी ५२ दिवसांवरून ३२३ दिवसांवर पोहचला आहे. त्याचबरोबर महिनाभरापूर्वी आठवडय़ाचा रुग्णवाढीचा वेग १.५७ टक्के होता. तो आता ०.२५ टक्क्यांवर आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत १ लाख २६ हजार ६८७ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख २१ हजार ४१३ रुग्ण बरे झाले आहेत. त्याचे प्रमाण ९५.८४ टक्के आहे. आतापर्यंत १ हजार ८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात ३ हजार ४४४ रुग्ण उपचार घेत आहेत. महिनाभरापूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी शहरात सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ०५ होती. त्यावेळेस रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के होते. गेल्या महिनाभरात ठाणे महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे करोनाचा संसर्ग काहीसा कमी झाला असून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढले आहे. ते आता ९५.८४ टक्के झाले आहे.

गेल्या वर्षीच्या डिसेंबर ते यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात करोनाचा संसर्ग ओसरला होता. या कालावधीत शहरामध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी पाचशे दिवसांच्या पुढे गेला होता. त्यामुळे रुग्णदुपटीच्या कालावधीची नोंद करणे पालिकेने बंद केले होते.

मार्च महिन्यापासून करोना संसर्ग वाढल्यानंतर पालिकेने पुन्हा रुग्णदुपटीच्या कालावधीची नोंद करण्यास सुरुवात केली. ७ मार्चला रुग्णदुपटीचा कालावधी २५४ दिवस इतका झाला होता. तर १६ एप्रिलला तो ५२ दिवसांवर आला होता. यामुळे शहरात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे समोर आले होते. आता रुग्णदुपटीचा कालावधी ३२३ दिवसांवर आला असून यामुळे शहरात करोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याचे स्पष्ट होत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या टाळेबंदी, करोनाबाधित रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यासाठी वाढविलेली चाचण्याची संख्या तसेच करोना संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना, या सर्वाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. शहरात रुग्ण संख्या कमी होऊ लागली असून यामुळे रुग्ण दुपटीच्या कालावधीत वाढ झाली आहे. योग्य उपचार पद्घती तसेच वैद्यकीय समुपदेशन यांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

-डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, पालिका

ठाणे शहरातील रुग्णसंख्या

  • उपचाराधीन रुग्ण- ३,४४४
  • लक्षणे असलेले रुग्ण- १,११९
  • लक्षणे नसलेले रुग्ण- १,८६२
  • जोखमीचे रुग्ण- ४६३