दुचाकींसाठी ४०० रुपये, तर कारचालकांना ५०० रुपये आकारणी

ठाणे : ठाणे पोलिसांनी कार आणि दुचाकीच्या कर्षित शुल्कामध्ये प्रत्येकी १०० रुपयांची वाढ केली आहे. यापुढे नियम मोडून वाहने उभी करणाऱ्या दुचाकी चालकाला ४०० रुपये आणि कार चालकाला ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

बेकायदा ठिकाणी वाहने उभी केल्यास ‘कर्षित’ (टोइंग) वाहनांद्वारे कारवाई करण्यात येत असते. यामध्ये दुचाकी चालकाला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २०० रुपये दंड आणि १०० रुपये कर्षित शुल्क असा एकूण ३०० रुपये दंड भरावा लागत होता, तर कारचालकांना नियमाचे उल्लंघन म्हणून २०० रुपये दंड आणि २०० रुपये कर्षित शुल्क असा ४०० रुपये दंड भरावा लागत होता. त्या दंडाच्या रकमेत आता प्रत्येकी १०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुचाकी चालकांना आता ४०० रुपये, तर कारचालकांना ५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. गेल्या १० वर्षांपासून कर्षित दंडामध्ये वाढ करण्यात आली नव्हती. तसेच वस्तू आणि सेवा कर लागू झाल्याने कर्षित शुल्कात वाढ करण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

टोइंग शुल्कातील वाढ

दुचाकीसाठी पूर्वी १०० रुपये कर्षित शुल्क होते. त्यात ७० रुपये वाढ

आणि ३० रुपये वस्तू सेवा कर असे एकूण १०० रुपये आकारणी

केली आहे. तर, कारचालकांना पूर्वी २०० रुपये सेवा शुल्क  होते.

त्यात ५५ रुपयांची वाढ करून त्यावर ४५ रुपये वस्तू सेवा कर आकारण्यात आला आहे.

नियम काय?

  •  एखाद्या वाहनावर कारवाई करताना भोंग्याद्वारे उद्घोषणा करणे बंधनकारक आहे, जेणेकरून तो वाहनचालक परिसरात आपले वाहन हटवू शकतो.
  •  कारवाईदरम्यान टोइंग वाहनामध्ये पोलीस कर्मचारी असणे बंधनकारक असते.
  • वाहन उचलतानाचे चित्रीकरण करणे आवश्यक.
  • वाहन उचलताना नुकसान झाल्यास टोइंग ठेकेदाराकडून वाहनमालकाला भरपाई.