गावठी कोंबडी २० रुपयांनी, तर ब्रॉयलर कोंबडी ३० रुपयांनी महाग

ठाणे : गणेशोत्सव संपताच अनेक जण पुन्हा मांसाहाराकडे वळले आहेत. मात्र, सध्या बाजारात कोंबडय़ांची आवक कमी होत असल्यामुळे ब्रॉयलर कोंबडीच्या दरात किलोमागे ३० रुपयांची तर गावठी कोंबडीच्या दरात २० रुपयांची वाढ झाली आहे. अंडय़ाच्या दरातही प्रति नग एक रुपयाने वाढ झाली असून येत्या काही दिवसांमध्ये चिकनच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

करोना विषाणूच्या सुरुवातीच्या काळात कोंबडीचे मांस खाल्लय़ामुळे करोना विषाणूची लागण होत असल्याची अफवा पसरल्यामुळे कोंबडी आणि अंडी खरेदी करण्याकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून काहीशा प्रमाणात या व्यवसायाला पुन्हा चालना मिळाली आहे. मात्र, उत्पादनाचा खर्च परवडत नसल्याने अनेक कुक्कुटपालन व्यावसायिकांनी उत्पादनात घट केली. परिणामी, बाजारात कोंबडय़ांची आवक कमी होऊ  लागली आहे. श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या कालावधीत अनेक जण मांसाहार खाण्याचे टाळतात. त्यामुळे या काळात कोंबडय़ांचे दर स्थिरावलेले दिसून येत होते. परंतु गणेशोत्सव संपताच मांसाहाराच्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. गणेशोत्सवात ब्रॉयलर कोंबडी १३० रुपये किलोने मिळत होती. सध्या या कोंबडीचा दर १६० रुपये किलोवर पोहोचला आहे. काही दिवसांपूर्वी गावठी कोंबडी २४० रुपये किलोने मिळत होती. सध्या गावठी कोंबडीच्या किलोचा दर २६० रुपयांवर पोहोचला आहे.

मासळीच्या दरांमध्ये मात्र घट

कोंबडीच्या मांसाचे दर जरी वाढले असले तरी मासळीच्या दरांमध्ये मात्र घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. ठाण्यातल्या म्हावरावाला डॉट कॉम या संकेतस्थळाचे संस्थापक सागर पाटील यांना विचारले असता त्यांनी पूर्वी १ हजार ११० ते १ हजार २०० रुपयांनी विकली जाणारी सुरमई सध्या ८८० रुपयांना विकली जात आहे. तर, ८०० रुपयांना विकली जाणारी कोळंबी आणि पापलेट आता ५०० ते ६०० रुपयांना विकले जात असल्याची माहिती दिली. समुद्रावर मासेमारीचे प्रमाण वाढल्यामुळे त्यांची आवकही वाढली आहे. त्यामुळे मासळीच्या दरात घसरण झाल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या बाजारात कोंबडीच्या मांसाला मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. मात्र करोनामुळे झालेल्या नुकसानीचा फटका उत्पादनावर पडला असून त्याच्यात घट झाली आहे. त्यामुळे कोंबडय़ांची आवकही रोडावली असून दरांमध्ये वाढ झाली आहे.

— इब्राहीम कुरेशी, कोंबडी विक्रेते