वसई : मागील काही दिवसांपासून शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मागील तीन दिवसांत शहरात ९० नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर केवळ १७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. याच दरम्यान उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली असून ती संख्या ३०९ वर जाऊन पोहचली आहे.

वसई-विरार शहरात करोनाचा कहर मागील आठवडाभरापासून वाढू लागला आहे. आतापर्यंत शहरातील करोना बाधित रुग्ण संख्येने ३० हजारांचा टप्पा ओलांडला आहे. एकूण बधितांची संख्या ३० हजार २४२ झाली आहे. तर आतापर्यंत २९ हजार ३४  म्हणजेच ९६ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

वसई-विरार शहरात करोना रुग्ण वाढीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र १९ फेब्रुवारीपासून पुन्हा शहरात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ  होऊ लागली आहे. सुरुवातीला सरासरी १० ते १२ रुग्ण आढळून येत होते तेच प्रमाण आता २० ते २५ च्या घरात जाऊन पोहचले आहे. तर करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही कमी झाली. त्यामुळे उपचाराधीन असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे.

१९ फेब्रुवारी दरम्यान २१० रुग्ण उपचाराधीन होते तेच २५ फेब्रुवारी पर्यंत ३०९ इतके झाले आहे. म्हणजे सात दिवसात ९९ उपचाराधीन रुग्ण वाढले आहेत. काही दिवसांपासून मृतांची संख्या ही स्थिरावली होती. परंतु सलग तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ही ८९९ एवढी झाली आहे. वसईत आतापर्यंत २ लाख ६ हजार २३१ इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.