ठाणे शहरात दहा दिवसांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साडे पाच टक्क्यांनी वाढले

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये करोना रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होऊ लागली असून त्याचबरोबर दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे. गेल्या दहा दिवसांत रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात साडेपाच टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क््यांवरून ८२ टक्क््यांपर्यंत घसरले होते. आता हे प्रमाण ९१.३१ टक्क््यांवर आल्याने आरोग्य यंत्रणांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत १ लाख २० हजार ९२५ करोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १ लाख ११ हजार ६१ रुग्ण बरे झाले असून त्याचे प्रमाण ९१.८४ टक्के आहे. आतापर्यंत १ हजार ७१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात ८ हजार १४८ करोना रुग्ण आहेत. मार्च महिन्यात शहरामध्ये करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आणि त्यानंतर शहरात दररोज १६०० ते १८०० रुग्ण आढळून येत होते. त्यावेळेस शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा १६ हजारांच्या पुढे गेल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण पडू लागला होता. रुग्णांना उपचारासाठी खाटा मिळत नव्हत्या. हे चित्र काही प्रमाणात बदलू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत घट झाली असून शहरात दररोज ६०० ते ७०० रुग्ण आढळून येत आहेत.  २३ एप्रिलला करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ८६ टक्के होते. गेल्या दहा दिवसांमध्ये त्यामध्ये वाढ होऊन ते आता ९१.३१ टक्के झाले आहे.

ठाणे शहरात करोना रुग्णांवर वेळेत उपचार केले जात असून त्याचबरोबर मृत्यूचे प्रमाण कमी  करण्याकडेही लक्ष दिले जात आहे. त्यामुळे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.

 शहरात दररोज आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येच्या तुलनेत रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे करोनामुक्तीचे प्रमाणात वाढ होऊन ते ९१.८४ टक्क््यांवर पोहोचले आहेत.  -संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका