घाऊक व्यापारी कमी झाल्यामुळे भाजीदरांत वाढ

ठाणे : ठाण्यातील जांभळीनाका या मध्यवर्ती बाजारात होणारी ग्राहकांची गर्दी कमी व्हावी यासाठी महापालिका प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या भागांत घाऊक बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी यामुळे भाज्यांचा पुरवठा वाढण्याऐवजी रोडावत चालल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. एका मोठय़ा बाजाराचे १७ वेगवेगळ्या लहान बाजारांमध्ये विलगीकरण करण्यात आले असले तरी शहरातील कानाकोपऱ्यात विखुरल्या गेलेल्या या बाजारांपर्यत पोहोचताना विक्रेत्यांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक घाऊक विक्रेत्यांनी व्यापार बंद केला असून यामुळे पुरवठा कमी होऊ लागला आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि महापालिकेकडून मोठय़ा प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. ठाण्यातील जांभळीनाका येथे मध्यवर्ती बाजारपेठ आहे. या ठिकाणी मिळणारी भाजी घाऊक दरांमध्ये उपलब्ध होत असल्यामुळे येथे किरकोळ विक्रेत्यांसह सर्वसामान्य ठाणेकरांचीही एरवी गर्दी पहायला मिळते. करोनाच्या काळातही ही गर्दी कायम असल्यामुळे जुन्या शहरात वेगवेगळ्या भागात ही बाजारपेठ स्थलांतरित करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला. सेंट्रल मैदानातही भाजी बाजार सुरू करण्यात आले. तरीही गर्दीवर नियंत्रण मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत असल्यामुळे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी १४ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्वच भाजीपाला दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. मंगळवारपासून पुन्हा भाजीची दुकाने उघडण्यात आली. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने जांभळीनाका भाजीपाला बाजारात नागरिकांची गर्दी होऊ  नये यासाठी हा बाजार पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला. किरकोळ विक्रेत्यांची गैरसोय टाळली जावी आणि ठाणेकरांना भाज्यांचा पुरवठाही सुरळीत व्हावा यासाठी महापालिकेच्या नऊ प्रभागांमध्ये एकूण १७ ठिकाणी घाऊक बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. घाऊक बाजाराच्या या विलगीकरणामुळे शहराच्या कानाकोपऱ्यात भरपूर भाजी उपलब्ध होईल असे आराखडे बांधण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र चित्र उलट दिसू लागले आहे. जांभळीनाका बाजारपेठेत व्यापार करणाऱ्यांपैकी अनेक विक्रेत्यांना जी ठिकाणं नेमून देण्यात आली आहेत ती त्यांच्या घरापासून दूर असल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहे. या व्यापाऱ्यांना नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जांभळीनाका बाजारात एकत्रित भाज्यांचा माल आणला जात असे. या बाजाराचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे माल आणण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे भाजी विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तसेच जी ठिकाणे नेमून देण्यात आली आहेत तेथे आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच अनेक ठिकाणी भाजी विक्रेत्यांना बसण्यास पोलिसांकडून नकार दिला जात आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांमध्ये नाराजीचा सूर असून अनेकांनी व्यवसायच बंद केल्याची माहिती पुढे येत आहे. याचा फटका आता शहरातील भाज्यांचा पुरवठय़ाला बसू लागला असून अनेक भाजी विक्रेते कळवा तसेच खारेगाव पट्टयातून येत असतात. यापैकी काहींना दूरवरची ठिकाणी नेमून देण्यात आल्याने अनेकांनी भाजी व्यापार थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.

जांभळीनाका येथील बाजारपेठेत विक्रे त्यांकडून सामाजिक अंतर राखले जात नव्हते. त्यामुळे ठाणेकरांच्या हितासाठी या बाजाराचे विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. जर त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणी भाजी विक्रीसाठी बसण्यास पोलिसांकडून अडथळा येत असेल, तर त्यांना परवानगीचे पत्र देण्यात येईल.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका.