घाऊक बाजारातील दर स्थिर असतानाही किरकोळीत लूट

लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे / बदलापूर : करोना विषाणूच्या पाश्र्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीच्या काळापासून जास्त मागणी असलेल्या भाज्यांना आता श्रावण महिन्यात आणखी मागणी वाढली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरांत २० ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, घाऊक बाजारात भाज्यांचे दर स्थिर असताना वाहतूक खर्च वाढल्याचे कारण देत किरकोळ विक्रेत्यांनी नफेखोरी सुरू केल्याचे दिसून येत आहे.

टाळेबंदीच्या काळात सुरुवातीला वाहतूकसंबंधीचे अनेक प्रश्न उद्भवल्याने भाज्यांची आवक काही अंशी घटली होती. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात भाज्यांचे दर कडाडले होते. मात्र आता टाळेबंदीत शिथिलता आली असून शहरात होणारी भाज्यांची आवक स्थिर आहे. असे असतानाही गेल्या दोन दिवसांपासून किरकोळ बाजारात भाज्यांचे दर वाढले आहेत. मंगळवारपासून श्रावण महिना सुरू  झाल्याने अनेकांनी मासांहार सोडून शाकाहार अवलंबला आहे. त्यामुळे भाजी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांचा पुरवठा स्थिर असला तरी किरकोळ विक्रेत्यांचा वाहतुकीचा खर्च वाढल्याने भाज्यांचे दर वाढल्याचे विक्रेते सांगतात. गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत भाज्यांचे दर हे २० ते ३० टक्कय़ांनी वाढल्याचे दिसून आले आहे.

किरकोळ बाजारात आठवडाभरापूर्वी ४० रुपये किलो असलेली भेंडी, फ्लॉवर, टोमॅटो आणि वांगी यांचे दर ६० रुपये किलोवर गेले आहेत. तर ५० ते ५५ रुपये असलेली गवार, फरसबी, शिमला मिरची यांचे दर ६० ते ८० रुपयांपर्यंत पोहचले आहेत. कोबी १५ रूपयांवरून २५ ते ३० रूपयांपर्यंत गेली असून वाटाणा शंभरीला पोहोचला आहे. ऐन श्रावणात मागणी वाढलेली असताना  अशा प्रकारे भाववाढ झाल्यास मध्यमवर्गीयांचे आर्थिक गणित कोलमडल्याची भीती व्यक्त होत आहे.

स्थानिक शेतकऱ्यांना विक्रीत अडचणी

ठाणे जिल्ह्य़ातल्या मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी आणि कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातून शहरी भागात स्थानिक शेतकरी मोठय़ा प्रमाणावर भाजी विक्रीसाठी येत असतात. तसेच आदिवासी महिलाही रानभाज्या विक्रीसाठी शहरांमध्ये येत असतात. मात्र टाळेबंदीबाबत असलेली उघडझाप आणि प्रतिबंधित क्षेत्रांची वाढत जाणारी संख्या यामुळे स्थानिक पालिकांकडून नवनवे नियम लागू केले जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी शहरात विक्रीसाठी येताना धजावत आहेत. त्यामुळे इतर भाजी विक्रेत्यांकडून दर वाढवून ग्राहकांना वेठीस धरले जात असल्याची भावना ग्राहक व्यक्त करत आहेत.