ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे लवकरच प्रस्ताव

ठाणे महापालिकेच्या भरतीप्रक्रियेदरम्यान स्थानिकांना सेवेत सामावून घेण्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होत असली तरी अद्याप स्थानिकांना पालिका सेवेत सामावून घेण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी महापालिकेने आरक्षक पदाच्या ३२७ जागांसाठी घेतलेल्या भरतीप्रक्रियेत ३२७ पैकी ठाणे जिल्ह्य़ातील केवळ १८ उमेदवार पात्र ठरल्याची बाब पुढे आली आहे. स्थानिकांचे हे प्रमाण जेमतेम सहा टक्के आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने आता स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून येत्या सर्वसाधारण सभेत त्यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

ठाणे महापालिका आस्थापनेवरील रिक्त पदांसाठी प्रशासन भरतीप्रक्रिया राबवीत असते. प्रत्येक भरतीप्रक्रियेदरम्यान पालिका सेवेत स्थानिकांना सामावून घेण्याची ओरड लोकप्रतिनिधींकडून होत असते, मात्र भरतीप्रक्रियेत स्थानिकांना सेवेत सामावून घेण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. परिणामी, राज्यभरातून आलेल्या उमेदवारांची पालिका सेवेत निवड केली जात असून त्यामध्ये स्थानिकांना फारसा वाव मिळत नाही. ठाणे महापालिकेने दोन वर्षांपूर्वी आरक्षक पदाच्या ३२७ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबिवली होती. या भरतीसाठी राज्यभरातून ४ हजार १४१ उमेदवारांनी भाग घेतला होता. त्यामधून ३२७ उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यात ठाणे जिल्ह्य़ातील केवळ १८ उमेदवार पात्र ठरले आहेत. जळगाव जिल्ह्य़ातून सर्वाधिक ५० उमेदवार पात्र झाले असून अहमदनगर ३५, नाशिक २५, नांदेड २५, बीड २३ आणि इतर जिल्ह्य़ांतील उमेदवारांचा समावेश आहे. महापालिका आरक्षक पदाच्या ३२७ जागांकरिता घेण्यात आलेल्या भरतीप्रक्रियेत जिल्ह्य़ातील केवळ १८ उमेदवार पात्र ठरल्याची बाब उघड होताच सत्ताधारी शिवसेनेने आता स्थानिकांना नोकरीमध्ये कोटा ठरवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

स्थानिकांना नोकरीत समावून घेण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नसल्यामुळे आरक्षक पदासाठी जिल्ह्य़ातील केवळ १८ उमेदवार पात्र ठरले असून, त्यामध्ये शहरातील उमेदवारांचा आकडा जेमतेम चार ते पाच आहे. त्यामुळे सर्वसाधारण सभेपुढे स्थानिकांना पालिका नोकरीमध्ये आरक्षणाचा कोटा ठरवून देण्यासंबंधी प्रस्तावाची सूचना मांडणार आहे.

मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे