वाहतूक दर्शक बसविण्यासाठी आयुक्तांना साकडे
रस्त्यांवरील वाढत्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. पदपथ व्यापाऱ्यांनी व्यापले आहेत. रस्ते वाहनांनी गजबजून गेले आहेत. शतपावलीसाठी घराबाहेर पडायचे तरी या गजबजाटाची मोठी भीती आणि सुरक्षितपणे रस्त्याने प्रवास करता येईलच याची खात्री नाही, अशी शहरातील ज्येष्ठ नागरिकांची खंत आहे. या ज्येष्ठ नागरिकांनी पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे कल्याण, डोंबिवली शहरांतील मुख्य रस्ते, चौकांमध्ये वाहतूक दर्शक (सिग्नल) बसविण्याची मागणी केली आहे.
निवृत्त झालेले अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळ, संध्याकाळ शतपावलीसाठी, महापालिकेच्या, खासगी वाचनलयांमधील ग्रंथालयात पुस्तके बदलणे, वर्तमानपत्र वाचन करणे या कामांसाठी ये-जा करीत असतात. काही ज्येष्ठ नागरिक जवळच्या उद्यानात, ज्येष्ठ नागरिक कट्टय़ावर बसण्यासाठी जातात. पण, घरातून बाहेर पडल्यानंतर हल्ली रस्ते वाहनांनी ओसंडून वाहात असतात. चौकात वाहतूक पोलीस असतोच असे नाही. मुख्य रस्ते, चौकांमध्ये वाहतूक दर्शक नसल्याने रस्ता कसा ओलांडून जायचा असा प्रश्न ज्येष्ठ नागरिक, वृद्धांना पडतो. प्रत्येक जण घाईत असल्याने कुणी रस्ता ओलांडून देण्यास पूर्वीसारखे सहकार्य करीत नाही, अशी खंत यावेळी व्यक्त केली.
पदपथ चालण्यासाठी असतात. पण या ठिकाणी फेरीवाले, दुकानदार यांचे वाढीव साहित्य ठेवलेले असते. त्यामुळे पदपथावर चालण्याची सोय नसते. अनेक वृद्धांना डॉक्टरांनी चालण्याचा सल्ला दिलेला असतो. हे सगळे पथ्य पाळण्यासाठी किमान रस्ते, पदपथ मोकळे असणे आवश्यक असते. तशी परिस्थिती राहिली नाही. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ते चौक भागात तातडीने वाहतूक दर्शक बसवावेत. वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्याने ते प्रत्येक चौकात उभे नसतात, असे या नागरिकांनी सांगितले. १६० ज्येष्ठ नागरिकांनी सुनीलनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी अनंत जोशी यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेतली.

गरज असलेली ठिकाणे..
डोंबिवलीत भाऊसाहेब पाटणकर चौक(फडके चौक), इंदिरा चौक, डॉ. शिरोडकर रुग्णालय चौक (मानपाडा रस्ता), टिळकचौक, मदन ठाकरे चौक, बाजीप्रभू चौक, ठाकुर्ली रेल्वे फाटक, पं. दीनदयाळ चौक, महात्मा फुले रिक्षा वाहनतळ, कोपर उड्डाण पूल पूर्व आणि पश्चिम बाजूला, कल्याणमध्ये शिवाजी चौक, सहजानंद चौक, लालचौकी, दुर्गाडी माता चौक, महात्मा फुले पोलीस चौकी चौक, मुरबाड रस्ता उड्डाण पूल, आयुक्त बंगला, टिळक चौक, पत्रीपूल, गुरुदेव हॉटेल चौक, काटेमानिवली चौक, तिसगाव नाका, सूचकनाका चौक.