News Flash

रखडलेल्या वाहनतळप्रकरणी खासदारांकडून रेल्वेची झाडाझडती

वाहनतळाच्या प्रश्नावरून ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला.

‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर मरेच्या महाव्यवस्थापकांकडे पाठपुरावा
पाच महिन्यांपूर्वी भूमिपूजन होऊनही रखडलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळाच्या प्रश्नावरून ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला जाब विचारला. ‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर या प्रकरणाची दखल घेऊन खासदारांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांची भेट घेत त्यांच्याकडे वाहनतळाच्या संथ कामाविषयी विचारणा केली.
पाच महिन्यांपासून रखडलेल्या या कामांवरून प्रवाशांमध्ये नाराजीची भावना असून त्या रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या वेळी करण्यात आला. हिवाळी अधिवेशनाच्या आधी रेल्वे विषयक प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी सूद यांची ठाण्याच्या खासदारांनी भेट घेतली. दस्तुरखुद्द रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन झालेल्या या वाहनतळाच्या संथ कामाविषयी ‘लोकसत्ता ठाणे’च्या वतीने पाठपुरावा करण्यात आला होता. या वृत्तानंतर खासदारांनी हा प्रश्न प्राधान्याने आणि जलदगतीने सोडवण्याची सूचना महाव्यवस्थापकांना केली. याबरोबरच ठाण्यातील फेरीवाल्यांचा प्रश्न, सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी, रखडलेली शौचालये, सरकते जिने आणि एफओबीची कामे यांचा आढावा खासदारांनी या वेळी घेतला.
फेरीवाल्यांप्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांना नोटिसा..
ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाचे व रेल्वे पोलिसांचे कर्मचारी अधिकारी असमर्थ ठरत आहेत. याबाबत वारंवार सूचना देऊनही या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली जात नाही, अशी खंत खासदारांनी व्यक्त केली. त्यावर ठाणे, कल्याण, दादर या रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर फेरीवाले मुक्त करण्यासाठी रेल्वेतील अधिकारी यांना १५ दिवसांची नोटीस बजविण्यात येईल. तरीसुद्धा हे फेरीवाले हटले नाही तर या संदर्भात योग्य ते पाऊल उचलले जाईल, असे आश्वासन सूद यांनी या वेळी दिले. तसेच यावेळी सीसीटीव्हींच्या निरुपयोगावरही लक्ष वेधण्यात आले.

लातूर एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा!
ठाणे रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाडय़ांपैकी लातूर एक्स्प्रेसला शनिवारपासून ठाणे रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ांना थांबे देण्यात आले नसल्याने दादर, पनवेल किंवा कल्याण या स्थानकात जाऊन या भागातील प्रवाशांना गाडी पकडावी लागत होती. मराठवाडय़ात जाण्याऱ्या लातूर एक्स्प्रेसलाही ठाण्यात थांबा नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. हे टाळण्याच्या दृष्टीने प्रवासी संघटनाच्या वतीने लातूर एक्स्प्रेसला ठाण्यात थांबा देण्याची मागणी जोर धरू लागली होती. खासदार विचारे यांनीही या प्रकरणी पाठपुरावा सुरू केला होता. रेल्वेचे महाव्यवस्थापक एस. के. सूद यांच्या भेटीदरम्यान शनिवार पासून ‘लातूर एक्स्प्रेस’ ठाण्यात थांबणार, अशी माहिती देण्यात आली. शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी रात्री ९.०० वाजता ठाण्यात ही गाडी थांबणार असून मराठवाडय़ातील रहिवासी स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 2:46 am

Web Title: increase traffic in thane 2
Next Stories
1 वाहनांची वर्दळ वृद्धांसाठी धाकधुकीची!
2 ‘कचराळी’ची अवस्था सुधारा
3 कट्टय़ावरची तिसरी घंटा!
Just Now!
X