सात दिवसांत कालावधी ७७ वरून १३५ दिवसांवर; करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९१ टक्के, मृत्युदर २.५० टक्के

 

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली असतानाच आता शहरातील करोनादुपटीचा कालावधी गेल्या सात दिवसांत ७७ वरून १३५ दिवसांवर पोहोचला आहे. तसेच करोनातून बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ९१ टक्क्यांवर पोहोचले आहे. मृत्युदर २.५६ टक्क्यांवरून २.५० टक्क्यांवर आला आहे. शहराच्या दृष्टिकोनातून हे दिलासादायक चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ४४ हजार ७८९ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी ४० हजार ८६० बाधित बरे झाले आहेत, तर आतापर्यंत एकूण १,१२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात १५ दिवसांपूर्वी दररोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळून येत होते. परंतु आता शहरात दररोज दोनशे ते अडीचशे रुग्ण आढळून येत आहेत. करोनाबाधितांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपयायोजना केल्या जात होत्या. त्याचबरोबर ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत शहरामध्ये घरोघरी जाऊन नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल केले होते. याशिवाय परराज्यातून रेल्वे मार्गे ठाणे शहरात येणाºया प्रवाशांची स्थानकात शीघ्र प्रतिजन चाचणी करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या सर्वच उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत.

ऑगस्ट महिन्यात करोना रुग्णदुपटीचा कालावधी ९० दिवसांचा झाला होता. परंतु सप्टेंबर महिन्यात रुग्ण वाढू लागल्यानंतर तो ६० दिवसांवर आला होता. गेल्या काही दिवसांत त्यामध्ये सुधारणा होऊन तो ६९ दिवसांवर आला होता. तर सात दिवसांपूर्वी रुग्णदुपटीचा कालावधी ७७ दिवसांवर आला होता. आता रुग्णदुपटीचा कालावधी १३५ दिवसांचा झाला आहे. त्यामुळे गेल्या सात दिवसांत ५८ दिवसांनी त्यात वाढ झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी करोनाबाधित बरे

होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. ते आता ९१ टक्क्यांवर आले आहे. त्याचबरोबर संपूर्ण शहरात दररोज होणाºया चाचण्यांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ११ टक्क्यांवरून ९.९५ टक्क्यांवर आले आहे. त्याचप्रमाणे शहरातील मृत्यूचा दरही कमी होऊन तो २.५० टक्क्यांवर आला आहे.

करोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. रुग्णदुपटीचा कालावधी वाढून १३५ दिवसांवर गेला आहे. मृत्युदर कमी होत आहे. रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाले. हे सर्व आमच्या अधिकारी-कर्मचारीवर्गाने एकत्रितपणे केलेल्या कामांमुळे शक्य होत आहे. तसेच यानिमित्ताने आमचे काम योग्य दिशेने सुरू असून यापुढेही अशाच पद्धतीने आमचे काम सुरू राहणार आहे. या कामात आम्हाला यश मिळेल, याची खात्री वाटते. – डॉ. विपिन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका