|| भगवान मंडलिक

जिमखाना, ग्रंथालय, संगणक शुल्कापोटी ४ हजार रुपयांचा भुर्दंड; शुल्क पुनर्रचनेसाठी विद्यापीठाचा शासनाकडे प्रस्ताव

कल्याण : करोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून ऑनलाइन शिक्षण दिले जात असताना मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेतील विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना १६ ते १७ हजार रुपये शालेय शुल्काच्या पावत्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये संगणक, जिमखाना, ग्रंथालय तसेच इतर अशा एकूण ४ हजार ८०५ रुपयांच्या अनावश्यक रकमेचा समावेश करण्यात आल्याने पालक हैराण झाले आहेत. याबाबत विद्यार्थी-पालकांनी व्यक्तिश: मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू, राज्याच्या शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या असून त्याआधारे मुंबई विद्यापीठाने शुल्क पुनर्विचाराचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.

महाविद्यालयांमध्ये अनुदानित, विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या तुकड्या आणि अभ्यासक्रम शिकविले जातात. प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या अनुदानित अभ्यासक्रमासाठी सुमारे सहा हजार रुपये शुल्क आकारले जाते. विनाअनुदानित बॅचलर ऑफ अकाऊंटिंग अ‍ॅण्ड फायनान्स, ऑडिटिंग अ‍ॅण्ड फायनान्स, बँकिंग इन्श्युरन्स, व्यवस्थापन पदवी, संगणक विज्ञान,  माहिती व तंत्रज्ञान अशा अभ्यासक्रमांसाठी १६ ते १७ हजार रुपये शुल्क विद्यार्थ्यांना भरावे लागते. करोना टाळेबंदीमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. आर्थिक स्थिती कोलमडल्याने हे शुल्क कसे भरायचे, असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. मात्र शिक्षकांचे पगार व इतर खर्चाचे कारण देत महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडे शुल्कासाठी तगादा लावला आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना १६ ते १७ हजार रुपये शालेय शुल्काच्या पावत्या देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये ४ हजार ८०५ रुपयांच्या अनावश्यक रकमेचा समावेश करण्यात आल्याचा दावा पालकांकडून करण्यात येत आहे. त्यात ग्रंथालय ३०० रुपये, जिमखाना ४०० रुपये, प्रयोगशाळा एक हजार रुपये, संगणक एक हजार रुपये, नोंदणी २२० रुपये, सुविधा ४०० रुपये, प्रशासन प्रक्रिया २०० रुपये, विकास ५०० रुपये, मॅगेझिन १०० रुपये, ओळखपत्र ५० रुपये, गट विमा २० रुपये, विद्यापीठ खेळ ३० रुपये, एनएसएस १० रुपये, विद्यार्थी साहाय्य ५० रुपये, ई-चेंज २० रुपये, इतर शुल्क २५० रुपये, प्रकुलगुरू निधी २० रुपये, अत्यावश्यक निधी १५० रुपये या शुल्कांचा समावेश आहे. करोना निर्बंधांमुळे गेल्या वर्षभरापासून महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी ऑनलाइनद्वारे शिक्षण घेत असतानाही ज्या सुविधांचा विद्यार्थी लाभ घेत नाहीत, त्याचाही शुल्कात समावेश करण्यात आले. त्यामुळे हे शुल्क कमी करावे अशी मागणी पालकांनी केली आहे. याशिवाय महाविद्यालयांनी ट्यूशन शुल्क १० हजार रुपये, परीक्षा शुल्क दोन हजार १४५ रुपये आकारले असून तेसुद्धा कमी करण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

‘शुल्काचा पुनर्विचार सुरू’

महाविद्यालयीन शुल्क कमी करण्यासंदर्भात विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाकडे पत्रे दिली आहेत. या शुल्कांचा पुनर्विचार केला जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्व महाविद्यालये, विद्यापीठाच्या सर्व विभागांना शुल्कासाठी विद्यार्थ्यांना त्रास देऊ नये तसेच विद्यार्थ्यांना एकदम शुल्क भरणे शक्य नसेल त्यांना चार टप्पे देऊन शुल्क भरण्याची सूचना करावी. शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, त्याला परीक्षेपासून वंचित ठेवू नये. तसेच शुल्क वाढविणे, कमी करणे शासनाचे अधिकार असल्याने विद्यापीठाने शासनाकडे यासंदर्भात एक प्रस्ताव दाखल केला आहे. याविषयी धोरणात्मक निर्णय आला तर त्याची तात्काळ अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. बळीराम गायकवाड यांनी दिली.