ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले आरोपी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या पाठोपाठ आता उर्वरित तिघा नगरसेवक आरोपींनीही ठाणे न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. या चौघांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने स्वतंत्रपणे सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रत्येकाला वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत.
सूरज परमार आत्महत्येप्रकरणी चौघा नगरसेवक आरोपींविरोधात न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला असून त्या अर्जावर ठाणे जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुल्ला यांच्या अर्जावर शुक्रवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान मुल्ला यांच्या वकिलांनी न्यायालयापुढे युक्तीवाद केला, मात्र विशेष सरकारी वकील राजा ठाकरे हे उच्च न्यायालयातील कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ठाणे न्यायालयात उपस्थित राहू शकले नाहीत. यामुळे या अर्जावरील सुनावणी आता येत्या १५ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे.