02 March 2021

News Flash

रानमेव्यासाठी स्वतंत्र बाजार

माळशेज घाट मार्गावर वनविभागातर्फे दालने उपलब्ध

मार्च ते जून मुरबाडच्या जंगलातील आंबे, जांभळे, करवंदे, पपई, आळीव आदी फळे विक्रीसाठी येत असतात. जूनपासून रानभाज्या येऊ लागतात.

माळशेज घाट मार्गावर वनविभागातर्फे दालने उपलब्ध

गाव परिसरातील जंगलात मिळणारी फळे, रानभाज्या तसेच इतर वनौपज रस्त्याच्या कडेला विकणाऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील आदिवासींना आता त्यांचा हा रानमेवा विकण्यासाठी स्वतंत्र बाजाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मुरबाड तालुक्यातील माळशेज घाट मार्गालगत वनविभागाच्या वतीने त्यासाठी सुसज्ज दालने उभारण्यात आली असून लवकरच ती परिसरातील गावपाडय़ातील आदिवासींना उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

वनहक्क कायद्यांतर्गत सामूहिक वनपट्टे मिळालेल्या मुरबाडमधील गावांनी आपापल्या वाटय़ाला आलेल्या जंगलाची चांगल्या पद्धतीने जोपासना केली आहे. स्थानिक गावसमित्यांच्या देखरेखीमुळे येथे चांगल्या पद्धतीने हिरवाई जपली आहे. मुरबाडच्या जंगलात सापडणारे आंबा, जांभूळ, करवंदे, आळीव आदी फळे तसेच विविध रानभाज्या, मध, बांबूपासून बनविलेल्या टोपल्या आणि विविध वस्तू सध्या स्थानिक आदिवासी कल्याण-नगर रस्त्याच्या कडेला बसून विकतात. आता रानातल्या या नैसर्गिक मेव्याच्या विक्रीसाठी एक स्वतंत्र बाजारपेठच वनविभागाने उभारली असून जूनच्या अखेरीपर्यंत ती स्थानिक गावकऱ्यांकडे सुपूर्द केली जाणार आहे. सध्या माळशेज घाटाजवळील शिसेवाडी आणि वैशाखरे गावाची मोहवाडी यांना ही दालने दिली जाणार आहेत. त्यानंतर गरजेनुसार बाजाराची व्याप्ती वाढवली जाईल.

मार्च ते जून मुरबाडच्या जंगलातील आंबे, जांभळे, करवंदे, पपई, आळीव आदी फळे विक्रीसाठी येत असतात. जूनपासून रानभाज्या येऊ लागतात. शेवळा, भारिंगा, वांघोटी, नारळी, कोळु, टाकळा, मोहदोडे, बेरसिंग, मोरवा आदी अनेक प्रकारच्या रानभाज्या या परिसरात मुबलक परिसरात मिळतात. माळशेज घाटाजवळ रस्त्यालगत तसेच टोकावडे, सरळगाव आणि मुरबाड येथील आठवडे बाजारांमध्ये या भाज्यांची विक्री आदिवासी महिला करतात. यंदा प्रथमच त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी स्वतंत्र बाजारव्यवस्था उपलब्ध होणार आहे.

सध्या रस्त्यावर विक्री होत असल्याने वाहतुकीला अडथळा होतो. अनेकांना इच्छा असूनही पार्किंगची व्यवस्था नसल्याने आदिवासींकडून रानमेवा खरेदी करता येत नाही. मात्र या नव्या बाजारात ही समस्या उद्भवणार नाही. शिसेवाडी गावाजवळ कल्याण-नगर रस्त्याच्या डाव्या बाजूला ही बाजारपेठ आहे. त्यामुळे नाणेघाटात येणाऱ्या पर्यटकांनाही या बाजारपेठेचा लाभ घेता येणार आहे.

आदिवासींना रोजगार मिळावा, या हेतूने ही बाजारपेठ उभारण्यात आली आहे. सध्या या बाजारात प्रत्येक गावाला एक असे तीन स्वतंत्र कक्ष दिले जातील. त्यात सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा केला जाईल. संबंधित गावांना त्यामार्फत फळे, भाजीपाला, रानभाज्यांची विक्री करता येईल. गावकऱ्यांनी संयुक्त समिती स्थापन करून वस्तूंच्या प्रमाणित किमती ठरवाव्यात. रानमेव्यासोबतच आदिवासींच्या कलाकुसरीच्या वस्तूंनाही या बाजारात विक्रीचे व्यासपीठ मिळावे, अशी अपेक्षा आहे.   तुळशीराम हिरवे, वनक्षेत्रपाल, टोकावडे, मुरबाड.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 1:15 am

Web Title: independent market for vegetables and fruits malshej ghat
Next Stories
1 कोबीची शंभरी, टोमॅटोची साठी!
2 दूधटंचाई सुरू!
3 मैदानांवर दुकानदारी
Just Now!
X