ठाण्यातील झोपडय़ांच्या पुनर्विकासाची योजना ठाणे शहरातूनच राबवली जावी या राजकीय आग्रहाला अखेर मान्यता मिळण्याची चिन्हे दिसू लागली असून या शहरातच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे स्वतंत्र्य कार्यालय स्थापण्याचा निर्णय जवळपास पक्का झाला आहे. याशिवाय या कार्यालयात मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीच नियुक्ती केली जाईल, असे संकेत मिळू लागले असून येत्या काळात मुंबईसोबत ठाण्यातील झोपडपट्टयांच्या सर्वेक्षणासाठी निवीदा काढण्यात येतील, अशी घोषणा ‘एसआरए’चे प्रमुख असीम गुप्ता यांनी बुधवारी ठाण्यात केली.
ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेला गती मिळावी यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने ठाण्यातील युआरसीटी येथे बुधवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस असीम गुप्ता यांच्यासोबत महापौर संजय मोरे, स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे, ठाणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुनील चव्हाण, सहाय्यक संचालक प्रदीप गोहिल, प्रमोद निबांळकर आदी मंडळी उपस्थित होती. राज्यातील कॉग्रेस आघाडी सरकारच्या काळात मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील झोपडपट्टयांच्या पुनर्विकासासाठी योजना जाहीर करण्यात आली. ही योजना जाहीर करताना अंमलबजावणीचे अधिकार मुंबई प्राधिकरणाकडे सोपविण्यात आले होते. त्यामुळे ठाण्यातील राजकीय नेत्यांमध्ये नाराजीचे सुर उमटू लागले होते. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे असलेला कामाचा भार लक्षात घेता ठाण्यातील झोपडपट्टयांचा पुनर्विकास खुंटेल, अशास्वरुपाची ओरड येथील राजकीय नेत्यांनी सुरु केली होती. यावर मार्ग निघावा यासाठी असीम गुप्ता यांना पाचारण करत या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी पुनर्विकास योजनेचे आराखडे मंजुरीचे अधिकार ठाणे महापालिकेकडे सोपविण्याची मागणी लावून धरली. मात्र, महापालिकेकडे हे अधिकार सोपविण्याऐवजी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचे स्वतंत्र्य कार्यालय ठाण्यात सुरु करण्यास असीम गुप्ता यांनी मान्यता दिली.

सव्‍‌र्हेक्षणासाठी निविदा
मुंबईच्या धर्तीवर येत्या तीन महिन्यात ठाण्यात स्वतंत्र्य कार्यालय स्थापून ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची त्याठिकाणी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव पाठविला जाईल, अशी माहिती यावेळी गुप्ता यांनी दिली. मुंबईत अधिक प्रभावीपणे ही योजना राबविण्यासाठी झोपडपट्टयांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. मुंबईसोबत ठाण्यातील झोपडय़ांच्या सर्वेक्षणासाठी निवीदा काढण्यात येतील, अशी घोषणाही गुप्ता यांनी यावेळी केली.