भारताने सलग गायनाचा चीनच्या नावावर असलेला विश्वविक्रम मोडीत काढला. खारघर नवी मुंबई येथील लिट्ल मॉलमध्ये विराग मधुमालती आणि त्याच्या टीमने रविवारी सलग गायनाचा नवीन विश्वविक्रम नोंदवला. चीनच्या नावावर सलग ७९२ तास २ मिनिटांच्या गायनाचा विश्वविक्रम होता. विराग मधुमालती यांच्या टीमने सलग ८९५ तास ४ मिनिटे गाऊन नव्या विश्वविक्रमाची नोंद केली. यावेळी गिनीज वर्ल्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ, कल्पना चावला यांचे वडील बन्सीलाल चावला तसेच निवृत्त प्रिंसिपल सायन्टिस प्रेम प्रकाश अतरेजा आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी गिनीज वर्ल्डचे ऋषी नाथ म्हणाले की, “मला अत्यंत आनंद होत आहे. भारताने हा रेकॉर्ड तोडला असून ८९५ तास ४ मिनिटांचा नवीन विश्वविक्रम केला आहे. विराग मधुमालती याच्या पुढील वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आहेत.”
प्रेम प्रकाश अतरेजा म्हणाले की, “मला खूप आनंद होत आहे विराग व टीमची मेहनत बघून, देशभक्ती बघून, जो कोणी स्वप्न बघतो व ती स्वप्न जर देशाच्या प्रगतीत हातभार लावणारी असतील तर त्यासाठी आमची पिढी, आजची पिढी तसेच येणारी पिढी ही साथ देईल. देश घडवणे व देशाचे नाव उज्वल करणे हे आपल्या हातात असते त्यादृष्टीने आपल्याला पावले उचले गरजेचे आहे.”

कल्पना चावलाचे वडील म्हणाले की, “मला येथे येऊन खूप बरे वाटले. मी मागच्या तीन वर्षांपासून आजारी आहे, तरीही या कार्यक्रमाने मला प्रचंड उत्साह आला. हा उपक्रम अत्यंत स्तुत्यपूर्ण आहे याने लोकांना एक नवीन दिशा मिळेल. खूप उच्च विचार आहेत, जर मोठे विचार केले तर आपण देशाला प्रगतिपथावर घेऊन जाऊ शकतो”

विराग मधुमालती वानखडे म्हणाले की, भारताच्या नावाने एक विश्व विक्रम अर्पण करताना मला जो आनंद होत आहे ते शब्दात मांडणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. भारतात जन्म घेतला ह्याचा मला खूप अभिमान आहे. आजचा दिवस सुवर्णमय आहे. या मागे माझ्या सगळ्या टीमच श्रेय आहे. या पुढेही भारताचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न राहील.

विराग मधुमालती आणि त्याच्या टीमने हा कार्यक्रम १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत राबवला. यात राष्ट्रीय एकात्मता, अवयवदान, बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ, स्टॉप ग्लोबल वार्मिंग, कैंपस विथ हेलमेट, सेव्ह वॉटर – सेव्ह ट्रीज, रक्त दान या ज्वलंत सामाजिक उपक्रमांचा प्रचार व प्रसार करण्यात आला. यात महाराष्ट्र, दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, ओरिसा, राजस्थान आणि इतर राज्यातून 800 हून अधिक गायकांनी भाग घेतला, हा अखंड संगीत यज्ञ गेले ३८ दिवस कलारासिकांसाठी एक संगीत मेजवानी ठरली.

या कार्यक्रमात चार कॅमेरे तसेच प्रत्येक सेकंदाची नोंद करण्यासाठी निरीक्षक ठेवण्यात आले होते. विविध नामांकित मंडळी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी भेट देऊन सर्वाना प्रोसाहित केले. विराग मधुमालती यांच्या नांवावर आजतागायत चार जागतिक विश्वविक्रमांची नोंद आहे. हे विक्रम राष्ट्रीय एकात्मता व नेत्रदान जनजागृतीसाठी समर्पित करण्यात आले आहेत.