24 October 2019

News Flash

भारतीय प्रशासकीय सेवा जगातील सर्वोत्तम करिअर!

आपण करीत असलेल्या कामांचा प्रभाव थेट लोकांच्या जीवनावर होत असतो.

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

व्यक्तिमत्त्व विकासासोबत जनतेची सेवा करण्याची संधी मिळत असल्याने भारतीय प्रशासकीय सेवा ही जगातील सर्वोत्तम करिअर संधी आहे, असे प्रतिपादन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी बुधवारी सकाळी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर बोलताना केले. आपण करीत असलेल्या कामांचा प्रभाव थेट लोकांच्या जीवनावर होत असतो. त्यातून मिळणारे समाधान खूप मोठे आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांना मी प्रोत्साहन देईन. कारण भारतीय प्रशासकीय सेवेसारखी करिअरची संधी जगातील दुसऱ्या कोणत्याही देशात आणि कोणत्याही करिअर मध्ये नाही, असेही ते म्हणाले.
ठाण्यातील ‘टिपटॉप प्लाझा’च्या सभागृहामध्ये बुधवारी ‘विद्यालंकार’ प्रस्तुत आणि ‘एसआरएम युनिव्हर्सिटी’सह प्रायोजक असलेल्या ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी परमबीर सिंग यांनी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधत भारतीय प्रशासकीय सेवेतील करिअरच्या संधी आणि त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक कामगिरीची माहिती करून दिली. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर या वेळी उपस्थित होते. या वेळी परमबीर सिंग यांनी प्रशासकीय सेवेची माहिती दिली. संसदीय लोकशाहीमध्ये प्रत्येक पाच वर्षांनंतर निवडणुका होऊन सरकार बदलत असते, परंतु प्रशासकीय अधिकारी हे कायमस्वरूपी कार्यरत असतात. शासन आणि प्रशासन कोणत्याही अडचणींशिवाय कायमस्वरूपी सुरू राहणे अपेक्षित आहे. प्रशासनासंदर्भातील प्राप्त ज्ञानाचा कायमस्वरूपी प्रवाह सुरू राहावा, त्यातून लोकप्रतिनिधींना योग्य मार्गदर्शन दिले जाईल, अशी भारतीय प्रशासकीय सेवेची कल्पना आहे. खाकी वर्दीचे आकर्षण प्रत्येकालाच असते. मला तर आजही ते आकर्षण आहे. शिस्तीच्या आणि वर्दीच्या प्रेमात असलेल्यांसाठी ही सेवा आनंद देणारी असते, असे ते म्हणाले.
मुंबईमध्ये नियुक्ती झाली तेव्हा एखाद्या घरामध्ये नवे लग्न असेल, घरामध्ये कार आली तरी व्यापाऱ्यांना अंडरवर्ल्डमधून धमक्या येऊन खंडणीची मागणी केली जात होती. अंडरवर्ल्डची दहशत संपुष्टात आणण्यामध्ये मुंबई पोलिसांनी केलेल्या कामात आपला सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले. एटीएसमधील नियुक्तीही कारकीर्दीतील सर्वोच्च संधी असल्याचे सांगत २६/११ च्या हल्ल्यात एटीएसप्रमुख हेमंत करकरे शहीद झाल्यानंतर सोपविण्यात आलेली जबाबदारी आव्हानात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. ठाणे आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर या भागामध्ये सोनसाखळी चोरांचे मोठे आव्हान महिलांसमोर होते. पोलीस प्रशासनाकडूनही महिलांनी दागिने घालून फिरू नये, असे आवाहन केले जात होते. महिन्याला सोनसाखळी चोरीच्या घटना ११० ते १२० पर्यंत वाढल्या. यावर कारवाई केल्यानंतर आता महिलांनी दागिने घालून फिरा असे सांगण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. ही संख्या महिन्याला ३० इतकी कमी झाली आहे. दिवाळीतील वाढत्या प्रदूषणावरही आम्ही कामे करून हे प्रमाण ५० टक्के कमी केले आहे, असे ते म्हणाले. ‘लोकसत्ता’च्या सुचिता देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. इतर मान्यवरांनीही यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.

राजकीय दबावाचा सामना कसा करता..
एखाद्या दबावाला आपण कसा प्रतिसाद देतो, त्याप्रमाणे दबाव बनवले जातात. लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे प्रत्येकाचे अधिकार वेगवेगळे असतात. त्यामुळे अशी मंडळी तुम्हाला निवेदन, अर्ज देऊ शकतात. मात्र त्यावर कोणते निर्णय घ्यायचे हे तुमचे तुम्ही ठरवायचे असते. एका ठराविक काळानंतर असे दबाव येणे बंद होते. ठाण्यामध्येही अशा प्रकारचे राजकीय सहभाग असलेली प्रकरणे राजकीय दबावाशिवाय हाताळली आहेत.

आजही संधी..
गुरुवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते संध्याकाळी ३ या वेळात टिपटॉप प्लाझा येथे ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ मार्गदर्शन सत्र होणार आहे.

मनाचे चांगले आरोग्य यशाचा मार्ग सुखकर करते
अभ्यास करत असताना मुलांना अनेक ताणतणावांचा सामना करावा लागत असल्याने पालकांनी त्यांच्याशी सुसंवाद साधत त्यांचे प्रश्न हाताळण्याची गरज आहे. दहावीला गेल्यानंतर घरामध्ये अचानक बदलणारे भितीदायक वातावरण दुर करून मुलांच्या मनाचे आरोग्य चांगले राखल्यास यशाचा मार्ग सुखकर बनतो. काळजी, भीती आणि रागामुळे मुलांमध्ये नकारात्मक गोष्टींची वाढ होण्याची शक्यता असते. चांगल्या दर्जाचे वरिष्ठ अधिकारी हे कोणत्याही मोठय़ा महाविद्यालयात घडत नसतात तर ते चांगल्या घरातून निर्माण होत असतात. त्यामुळे घरातील वातावरण खेळीमेळीचे असणे मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक आहे. मुलांशी संवाद साधल्याने त्यांचा आत्मविश्वास नक्की वाढण्यास मदत होऊ शकते. तुम्ही मुलांचे पालक असल्याने त्यांना ते बदलण्याचा कोणताच पर्याय त्यांच्यासमोर नसतो, त्यामुळे त्यांचा स्वीकार करा. योगा, व्यायामाच्या माध्यमातून यातून मनाचे चांगले आरोग्य राखता येते. मुलांना सकारात्मक गोष्टी सांगा, त्यांची तुलना इतरांशी करून त्यांचे खच्चीकरण करणे टाळा.
– डॉ. हरिश शेट्टी,
मानसोपचार तज्ज्ञ

कल, कुवत आणि क्षमता पाहून करिअर निवडा..
दहावी बारावीनंतर पुढे काय करायचे याचा विचार बहुतेक विद्यार्थी हे मिळालेल्या गुणांवर ठरवतात. परंतू त्यांचा हा समज चुकीचा असून आधीच आपले करिअर निश्चित करुन, त्याचा थोडा फार अभ्यास करुन त्यादृष्टीने आपण पावले उचलणे गरजेचे आहे. विज्ञान, कला, वाणिज्य या शाखांमध्ये आपल्याला मोजक्याच संधींची माहिती आहे, परंतू आपल्या कल्पना शक्तीच्या पलीकडेही अनेक संधी यात उपलब्ध असून आपला कल, आपली कुवत आणि क्षमता पाहून आपण त्याची निवड केली पाहीजे. असे विवेक वेलणकर यांनी सांगितले. लिखाण आणि वाचन याची आवड प्रत्येक विद्यार्थ्यांला असली पाहीजे त्यामुळे त्यांच्या ज्ञानात भर पडेल. तसेच पालकांनी सध्या मुलांना एका व्यसनापासून दूर ठेवायला हवे.
सोशल मिडीया, व्हॉट्स अ‍ॅपचा वापर ऐवढा
वाढला आहे की त्याची सवय सुटू शकत नाही मात्र कमी करु शकतो. परिक्षेच्या काळात किंवा
अभ्यास करताना मोबाईल पूर्णत बंद ठेवून दुसऱ्या खोलीत ठेवा तुमच्या मार्कात नक्कीच बदल घडेल, अन्यथा तो तुमचे नुकसान करेल.
– विवेक वेलणकर,
करिअर
समुपदेशक

अंगभूत गुणांमुळे व्यक्तिमत्त्वाला उभारी येते..
विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुणांमुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उभारी येते. व्यक्तिमत्त्व घडण्यासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात अठरा वर्षांचा काळ जावा लागतो. या काळात आपले व्यक्तिमत्त्व आपल्यालाच घडवावे लागत असून आठ तासांच्या कार्यशाळेतून कोणाचेही व्यक्तिमत्त्व घडत नाही. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील १६ ते २१ ही उर्जादायी व उत्साहवर्धक वर्षे असून या वर्षांतच विद्यार्थ्यांनी आपली सॉफ्ट स्किल्स विकसित करण्यासाठी प्रयत्नशील रहावे. या काळात ही सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकसीत करण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालय हे व्यासपीठ उपलब्ध असून महाविद्यालये ही व्यक्तिमत्त्व विकासाची प्रमुख केंद्रे आहेत. सॉफ्ट स्किल्सचा विकास करताना विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्ये, वाचनाची सवय तसेच नोकरी अर्जासाठीचे स्व परिचय पत्र, मुलाखतीची तयारी, पेहराव आदी बाबींकडे गांभिर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच विद्यार्थ्यांनी शिकत असताना केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावरच लक्ष केंद्रित न करता बाहेरील जगात प्रवेश करून नव-नवी आव्हाने स्वीकारत त्यातून आलेल्या अनुभवातूनही शिक्षण घ्यावे.
– गौरी खेर, सॉफ्ट स्किल्सविषयक प्रशिक्षक

‘लोकसत्ता मार्ग यशाचा’मध्ये ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मार्गदर्शन केले. छाया : दीपक जोशी

First Published on December 3, 2015 4:03 am

Web Title: indian administrative service is the best career in the world