हिमाचली रारा, राजस्थानी लाल मास, पनीर लझीज, लसूणी पालक हे विविध प्रांतातील हे पारंपरिक पदार्थ आहेत. चायनीज, मेक्सिकन, इटालियन अशा पाश्चिमात्य, आशियाई चवीच्या प्रेमात तरुण पीढी आहे. या पीढीला देसी, त्यातही गावरान पदार्थाची चटक लागावी म्हणून विरारमधील दोन तरुण भावंडांनी प्रयत्न सुरू केले. त्यांनी पारंपरिक पण लुप्त होत चाललेल्या गावरान पदार्थाचा शोध घेतला आणि हे पदार्थ त्यांनी खवय्यांसमोर सादर केले. भारतीय पारंपरिक खाद्य संस्कृतीमध्ये मांसहारी पदार्थासाठी मोगलाई, मालवणी, आगरी प्रकारांना उत्तम प्रतिसाद मिळतो. मात्र, भारतातील असे अनेक प्रांत आहेत जेथील मांसाहारी प्रकारही उत्तम असतात. हे पदार्थ तुम्हाला विरारच्या पब्लिक रेस्टॉरंटमध्ये चाखायला मिळतील. हिमाचली रारा, राजस्थानी लाल मास, पंजाबी ढाब्यावरील चिकन ढाबा, पनीर लझीज, लसूणी पालक हे सहसा खाल्ले न जाणारे पदार्थ इथे मिळतात. नागपुरी पदार्थ ही इथली खासियत. नागपूार प्रांतातील चव शोधणाऱ्यांसाठी येथील झणझणीत सावजी, वऱ्हाडी, कंधारी मटण, चिकन उपलब्ध आहे. हे पदार्थ खवय्यांसमोर आणणारे प्रसेनजीत आणि चेतन इंगळे हे भाऊ हे हॉटेल उभारण्यामागची कथा सांगतात. हे दोघे पट्टीचे खवय्ये. खाण्यासाठी प्रवास करणे हा त्यांचा छंद. मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना खाण्याचे बरेच पर्याय असतात, पण विरार-वसईकरांसाठी पारंपरिक, लुप्त होत चाललेले आणि अस्सल पदार्थ उपलब्ध करून द्यायला हवे असा विचार त्यांच्या मनात आला. काही वेळा त्या त्या प्रांतात जाऊन तर काही वेळा त्या प्रांतातून आलेल्या नागरिकांच्या घरात जाऊन त्यांनी हे पदार्थ चाखले. त्याची चव, कृती समजून घेत तसे स्वयंपाकी तयार केले. मुंबईच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये एका पदार्थाची चव वेगवेगळी लागते, त्याची अस्सल चव आम्हाला हवी होती असे इंगळे बंधू सांगतात. त्यांच्या मते अनेक पारंपरिक पदार्थाबद्दल लोकांना माहितीही नसते, उदाहरणार्थ वैदर्भीय, खान्देशी, मराठवाडय़ातील पदार्थ. हे पदार्थ तुम्हाला आमच्या रेस्टॉरंटमध्ये खायला मिळतील. इथे शाकाहाऱ्यांसाठीही वऱ्हाडी कढी, झुणका भाकर, मिरचीचा ठेचा, खान्देशी खिचडी असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यातील पारंपरिक पदार्थ जसेच्या तसे ग्राहकांसमोर सादर व्हावेत असा या दोघांचा कटाक्ष असतो. यासाठी ते पारंपरिक पद्धतीने तयार केलेले घरगुती मसालेच वापरतात. पनीर वऱ्हाडी, जालफ्रेजी, लसुणी हंडी चिकन, चिकन आचारी, रसरशीत मटण सूप असेही पदार्थ येथे उपलब्ध आहेत. खाली लख्ख प्रकाशातली बैठकव्यवस्था तर पोटमाळ्यावर भारतीय बैठी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. तरुण ग्राहकांसाठी दर गुरुवारी कँडल लाइट डिनरची व्यवस्था आहे. त्यासाठी प्रकाशयोजना करण्यात येते. अनेक जण मध्यरात्री काामावरून परत येतात. त्यांना मध्यरात्रीनंतरही घरपोच जेवण देण्याची सोय आहे. फूड नेव्हर टेस्टेड बिफोर अशी टॅगलाइनच घेऊन पब्लिक ग्राहकांना साद घालत आहे.