भारतात दरवर्षी सुमारे ८० लाख मृत्यू होत असतात. यापैकी केवळ २५ हजार व्यक्तींचेच नेत्रदान होत असते. याउलट श्रीलंकासारख्या लहान देशामधील नागरिक नेत्रदानात सर्वात आघाडीवर आहेत. भारतात नेत्रदानाविषयी मोठय़ा प्रमाणावर जागृती होणे आवश्यक आहे, असे झाल्यास आपण संपूर्ण जगाला नेत्रांचा पुरवठा करू शकतो, असा विश्वास नेत्रदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीपाद आगाशे यांनी व्यक्त केला गेली ३४ वर्षे नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण करणाऱ्या आगाशे यांचे राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा निमित्ताने ‘नेत्रदान काळाची गरज’ या विषयावर ठाण्यातील अत्रे कट्टा येथे मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.श्रीलंकासारखा लहान देश भारतासारख्या मोठय़ा देशाला दरवर्षी दहा हजार नेत्र पुरवितो. त्याचबरोबर आणखी ३६ देशांनाही श्रीलंकेतून नेत्रपुरवठा केला जातो. भारतासारख्या सुमारे १२५ कोटींची लोकसंख्या असलेल्या भारतात मात्र याविषयी उदासीनता आहे याविषयी त्यांनी या वेळी खंत व्यक्त केली. यासंबंधीची माहिती आपण एका मासिकात वाचली आणि त्याच वेळी नेत्रदानाचा प्रसार करण्याचा निर्णय घेतल्याचे आगाशे यांनी स्पष्ट केले. नेत्रदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान असते. असे असले तरी भारतीयांना तसे वाटत नसावे, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला. जगातील एकूण नेत्रहीन व्यक्तीपैकी २० टक्के  म्हणजे सव्वा कोटी नेत्रहीन भारतात असून त्यातील ३० लाख नेत्रहीन व्यक्तींना नेत्ररोपणाने दृष्टी प्राप्त होऊ  शकते, असे ते म्हणाले.भारतातील नागरिकांमध्ये नेत्रदानाविषयी वेगवेगळ्या प्रकारचे गैरसमज आणि अंधश्रद्धा असल्याचे ते म्हणाले. नेत्रदान केल्यामुळे पुढच्या जन्मी चेहरा विद्रूप होतो किंवा पुढील जन्मात अंधत्व येते, मोक्ष मिळत नाही अशा अंधश्रद्धांनी कित्येकांच्या मनात घर केले आहे. तसेच अनेक डॉक्टरांमध्येही या संकल्पनेविषयी फारशी स्पष्टता नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर नेत्रदानाचा कोणताही अर्ज भरला नसतानाही मृत व्यक्तींच्या नातेवाईकाची परवानगी असल्यास नेत्रदान होऊ  शकते. ही बाब अनेकदा डॉक्टरांना माहीत नसते असेही त्यांनी सांगितले. हळूहळू लोक नेत्रदानासाठी पुढे येत आहेत. हा बदल पुरेसा नसून नेत्रदानाविषयी अधिकाधिक जनजागृती होणे अपेक्षित आहे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले. जन्मजात बालकापासून अगदी १०० वर्षांच्या स्त्री-पुरुषांपर्यंत कोणाचेही नेत्रदान होऊ  शकते. कुठल्याही प्रकारचा चष्मा लावणारे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेले, मधुमेही आणि रक्तदाब असलेल्या व्यक्तीही नेत्रदान करू शकतात अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. मृत्यूनंतर लवकरात लवकर ३ ते ४ तासांत नेत्रदान होणे आवश्यक असून आपल्या नेत्रदानाच्या इच्छेविषयी जवळच्या नातलगांना, वारसांना माहिती असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आगाशे यांनी नेत्रदानाविषयी असलेल्या समज-गैरसमजेवरही भाष्य केले.