दिवा स्थानकात इंडिकेटर गायब; लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या प्रतीक्षेदरम्यान प्रवाशांचा गोंधळ

ठाणे : सुविधांची आधीच वानवा असलेल्या दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५, ६, ७ आणि ८ वर लांबपल्ल्याच्या गाडय़ांचे नाव, क्रमांक, गाडी येण्याचा अपेक्षित कालावधी याची माहिती दर्शवणारे इंडिकेटरच फलाटावर नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी प्रवाशांचा गोंधळ उडत आहे. एक्स्प्रेस गाडय़ांची विचारपूस करण्यासाठी दिवा पश्चिमेला जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

दिवा रेल्वे स्थानकातून कल्याण आणि मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्याचे पाहायला मिळते. दिवा रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाडय़ांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी,  रेल्वे फाटकाऐवजी वाहतूकीसाठी उड्डाणपूल बांधण्यात यावा यासारख्या विविध मागण्या दिवा रेल्वे प्रवाशांकडून होत असल्या तरी रेल्वे प्रशासन हे स्थानकातील मूलभूत मागण्यांकडेच कानाडोळा करत असल्यामुळे प्रमुख मागण्यांकडे आस लावून बसणेच चुकीचे असल्याचे दिवा रेल्वे प्रवाशांकडून सांगण्यात आले आहे.

यापैकीच एक मुलभूत मागणी म्हणजे इंडिकेटर होय. दिवा रेल्वे जंक्शनमधून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या पॅसेंजर गाडय़ा सुटतात. दिवा-पनवेल मेमू, दिवा-रोहा डेमू, दिवा-वसई डेमू या रेल्वे गाडय़ा  दिवा रेल्वे स्थानकातून सुटतात. मात्र कोणत्या फलाटावरून कोणती गाडी सुटते, गाडी येण्याचा अपेक्षीत कालावधी काय आहे हे दर्शवणारा एकही इंडिकेटर स्थानकावरील ५, ६, ७ आणि ८ या क्रमांकाच्या फलाटांवर दिसून येत नाही.

त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेस या फलाटावर येणाऱ्या गाडय़ांमधून प्रवास करताना प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येते. या गाडय़ांचे वेळापत्रक नसल्याने प्रवाशांना तास्नतास गाडय़ांची वाट पाहत फलाटावर उभे रहावे लागत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.

या फलाटांवर काही ठिकाणी छप्परही नाही त्यामुळे उन्हाळ्यात, पावसाळ्यात प्रवाशांना छप्पर नसल्याने हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असल्याची प्रतिक्रिया येथील प्रवाशांनी दिली.

प्रवासी संख्येत वाढ

दिवा रेल्वे स्थानकातून तळोजा, नावडे, कळंबोली आणि रसायनी या मार्गावरून पुढे रोहा दिशेने रेल्वे पॅसेंजर गाडय़ा जातात. या मार्गावर नवनवी गृहसंकुले उभी राहत आहेत. परिणामी दिवा स्थानकांतून या दिशेने पॅसेंजर रेल्वे गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ होत असल्याचे रेल्वे संघटनांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिवा रेल्वे जंक्शनमधील प्रवाशांची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने योग्य उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे दिवा रेल्वे प्रवाशी संघटनेने सांगितले.

फलाटांवर इंडिकेटर तसेच छत नसल्याविषयी वरिष्ठांना माहिती देण्यात आली आहे. त्याबद्दल लवकरच मंजुरी मिळाल्यावर तातडीने काम सुरू करण्यात येईल.

– शंकर नारायण, दिवा स्थानक व्यवस्थापक

५, ६, ७ आणि ८ या फलाटांवर इंडिकेटर आणि छप्पर असावे याकरिता गेल्या काही वर्षांपासून  रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

-अ‍ॅड आदेश  भगत, अध्यक्ष- दिवा रेल्वे प्रवाशी संघटना