|| ऋषिकेश मुळे

वर्षभरात ६ लाख ६१ हजार गुन्हे दाखल

वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्यांविरोधात गेल्या वर्षभरात ठाणे वाहतूक पोलिसांनी तब्बल सहा लाख ६१ हजार गुन्हे दाखल केले आहेत. अवजड वाहनांची मोठय़ा प्रमाणावर अवैध वाहतूक, पार्किंगचे नियम मोडणे, सिग्नल यंत्रणेला वाकुल्या दाखविणे असे प्रकार या शहरांमध्ये सर्रास घडत असून, त्यातून पोलिसांनी १५ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील शहरांची लोकसंख्या दिवसागणिक वाढत आहे. नव्या टोलेजंग इमारती, गृहसंकुले उभी राहू लागली आहेत. प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी उन्नत मेट्रो मार्गिका चार आणि पाचचे काम हाती घेण्यात आले आहे. जुन्या ठाण्यामध्ये देखील रस्ता रुंदीकरणाची कामे महापालिकेकडून हाती घेण्यात आली आहेत. एकीकडे प्रवास सुकर करण्यासाठी प्रयत्न सुरू असताना, वाहतवाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली आहे.

गेल्या वर्षभरात वाहतुकीशी निगडित ४३ प्रकारच्या गुन्ह्य़ांखाली ठाणे वाहतूक पोलीस विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. अवैध ठिकाणी वाहने उभी करणाऱ्या एकूण ८५ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून या कारवाईतून २ कोटी ३८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाहन परवाना न बाळगल्याने ६४ हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून १ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शहरात पूल आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक धिम्या गतीने सुरू असते. काही चालक विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. त्यामुळे कोंडीत भर पडते. नियमभंगामुळेच कोंडी वाढते हे वाहनचालकांनी समजणे आवश्यक आहे. पालकांनीच पाल्यांमध्ये ही स्वयंशिस्त रुजवणे गरजेचे आहे. ठाणे वाहतूक पोलिसांकडून केवळ कारवाईच होत नाही तर जनजागृतीही केली जाते.   – अमित काळे, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक विभाग