भाडे नाकारणे, मीटर बंद ठेवणे सुरूच; फेरीवाल्यांमुळे वाहतुकीत अडथळे

प्रवाशांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या तक्रारी आणि प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांनंतरही ठाण्यातील रिक्षाचालकांची मनमानी सुरूच आहे. ठाणे स्थानकाबाहेर सॅटिसच्या पुलाखाली असलेल्या रिक्षा थांब्यावर जवळचे भाडे नाकारणे, रांगेची शिस्त न पाळणे, प्रवाशांना वाटेत अडवणे, लांबच्या ठिकाणी जाण्यासाठी मीटरऐवजी मनमानी भाडे आकारणे, असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे रांग लावल्यावर रिक्षा मिळणारच या विश्वासाने तासन्तास तिष्ठत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना रिक्षाचालकांच्या अरेरावीला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक पोलीसही याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे ठाणेकर त्रासले आहेत.

घरापासून रेल्वे स्थानकापर्यंत आणि तसाच परतीचा प्रवास रिक्षाने करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्थानक परिसर सतत गजबजलेला असतो. स्थानकाबाहेरच रिक्षांचा थांबा आहे. मात्र काही मुजोर रिक्षाचालक फलाटाबाहेर पडलेल्या नागरिकांना सॅटिसच्या पुलाखालीच अडवत भाडे विचारतात. नागरिकांनी टेंभीनाका, गोखले रोड असे जवळचे ठिकाण सांगितल्यास रिक्षाचालक नकार देतात. याशिवाय घोडबंदर, वसंतविहार अशी दूरची ठिकाणे सांगितल्यास होकार देतात, मात्र मनमानी भाडे आकारत. विवियाना मॉलला जाण्यासाठी दीडशे रुपये आणि  घोडबंदर परिसरात जाण्यासाठी तब्बल दोनशे रुपयांची मागणी केली जाते. नवे प्रवासी यात फसतात. रिक्षा थांब्याजवळ रिक्षा उभ्या न करता काही चालक सॅटिसखाली इतरत्र रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळी स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. याशिवाय सॅटिस पुलाखाली फेरीवाले राजरोस ठाण मांडतात. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. फळविक्रेते, चप्पलविक्रेते यांसारख्या फेरीवाल्यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसर व्यापला आहे.

 

परदेशी पर्यटकांची फसवणूक

मुंबईत येणाऱ्या पर्यटकांपैकी अनेक जण ठाण्याला भेट देतात. त्यांची फसवणूक करून त्यांना रिक्षाचालक लुबाडतात. त्यांच्याकडून मनमानी भाडे उकळतात. मंगळवारी सकाळी एका चिनी पर्यटकाकडून विवियाना मॉल येथे जाण्यासाठी रिक्षाचालकाने १८० रुपये घेतले. अशा प्रकारे अनेक प्रवाशांची दररोज फसवणूक होत असते.

अनधिकृत पार्किंग..

रेल्वे स्थानक परिसरात वाहने उभी केल्यास कारवाई करण्यात येईल, असा फलक लावला असला तरी तिथेच दुचाकी वाहने उभी केली जातात. पोलीस चौकीच्या बाहेर दुचाकी वाहने पार्क केल्याने रस्त्याचा बराचसा भाग वाहनांनी व्यापलेला आहे. विशेष म्हणजे याच परिसरात चारचाकी वाहनेही अनधिकृतपणे उभी केली जातात. तासन्तास वाहने उभी असली तरी या वाहनचालकांवर कारवाई होत नाही.

बेकायदा पार्किंग, फेरीवाल्यांवर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई केली जाते. मात्र कारवाई करण्यासाठी दोनच कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. गर्दीच्या तुलनेत ते कमी पडतात. फसवणूक करणाऱ्या रिक्षाचालकांवर वाहतूक विभाग कारवाई करेल. मात्र काही प्रवासीही नियमबाह्य़ प्रवासाला खतपाणी घालतात  – संदीप पालवे, उपायुक्त, वाहतूक शाखा, ठाणे