30 September 2020

News Flash

लग्नसराईसाठी इंडो-वेर्स्टन ‘गाउन’चा साज..

यंदा लग्नसराईच्या हंगामात ‘लेहेंगा-चोलीला’ आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी या वेडिंग गाउनशी स्पर्धा लागतेय.

वेडिंग गाउन

दिवस लग्नसराईचे आहेत. गेली दोन वर्षे लग्नसराई आणि सणांच्या हंगामात पायघोळ, घेरेदार अनारकली सुट्सनी आपले स्थान अबाधित ठेवले होते. यंदा मात्र पारंपरिक वस्त्रांना पाश्चिमात्य कलाटणी देऊन विविध प्रकारच्या ‘वेिडग गाउन्स’नी सध्या बाजारात आपला दबदबा निर्माण केला आहे. केवळ लग्नसराईच नव्हे तर नववर्षांनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या पाटर्य़ामध्येही यंदा अगदी ठसठशीतपणे या गाउन्सनी आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तरुणींना या गाउनने अक्षरश: भुरळ घातली आहे, असे काही विक्रेत्यांचा दावा आहे. त्यामुळे यंदा लग्नसराईच्या हंगामात ‘लेहेंगा-चोलीला’ आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी या वेडिंग गाउनशी स्पर्धा करावी लागतेय.

नेट, शिफॉन, जॉर्जेटपासून थेट कॉटनपर्यंत विविध कापडांमध्ये हे गाउन उपलब्ध आहेत. मोठय़ा लग्नांपासून ते छोटय़ा समारंभांपर्यंत विविध प्रसंगी ते परिधान करता येतात. सुरुवातीला त्यांच्या उंची आणि घेऱ्यामुळे हे गाउन केवळ उंच आणि सडपातळ मुलींनाच परिधान करता येतील, असा सर्वसाधारण समज होता. त्यामुळे या वस्त्राला मागणीही मर्यादित होती. कालांतराने विविध वयोगटांच्या आणि उंचीच्या तरुणी आणि महिलांनी हा समज अक्षरश: उडवून लावला आहे. एक काळ होता वेडीन गाउन ही नववधूने परिधान करायचा पोशाख असे समीकरण ठरलेले असायचे. गेल्या काही वर्षांपासून लग्नसराई आणि सणांच्या दिवशी हे लाँग गाउन्स इतरांच्या अंगावर खेळू लागले आहेत. ही वाढती मागणी लक्षात आल्याने यंदा नववर्षांच्या स्वागतासाठी बडय़ा दुकानांपासून ते रस्त्यावरील बाजारपेठाही या गाउन्सनी सजल्या आहेत.

‘गाउन’ हा प्रकार फार पूर्वीपासून ख्रिस्ती समाजात पाहायला मिळायचा. चित्रपट, फॅशन शोमधून कलाकार आणि उच्चवर्गीय समाजात हा पोषाख लोकप्रिय झाला आणि बाजारातही पहायला मिळू लागले. लेहेंगा-चोली आणि दुपट्टा असे तीन प्रकार परिधान करण्याऐवजी एक ‘गाउन’ लग्न समारंभामध्ये परिपूर्ण ठरतो. एकप्रकारे ‘वन पिस’ची लांब आवृत्ती म्हणून तरुणींमध्ये हा प्रकार लोकप्रिय ठरू लागला आहे. सध्या पार्टी आणि लग्न समारंभासाठी गाउन्सचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. सध्या बाजारामध्ये २,००० रुपयांपासून गाउनच्या किमतीला सुरुवात होते. तर डिझायनर दुकानांमध्ये तीस हजारांहून अधिक किमतीचे गाउन उपलब्ध आहेत. लग्नाच्या मोसमात यांना जास्त मागणी असून दिवसाला १० ते १५ गाउन्सची विक्री सहजपणे होत असल्याचे ठाण्यातील ‘पायल’ दुकानाच्या विक्रत्याने सांगितले. साडी किंवा लेहेंगा सांभाळता न येणाऱ्या मुली या अशा प्रकारच्या गाउन्सना पसंती देत असल्याचे ते सांगतात.

प्रत्येकाच्या आयुष्यातील शुभविवाहाचा क्षण हा महत्त्वाचा मानला जातो. याबाबतीतही ‘झटपट संस्कृती’ उदयास येत असल्याचे अलीकडील काळात पाहायला मिळत आहे. लग्न ठरलं की, पहिली धावपळ असते खरेदीची आणि खरेदीतही पहिला नंबर असतो कपडय़ांचा. पण फॅशन ट्रेण्ड सतत बदलत असतात. सध्या पारंपरिक साडी आणि रिसेप्शन किंवा साखरपुडा, हळद, मेहंदी आदी कार्यक्रमांना वेस्टर्न गाउन्सची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढलेली दिसून येते.

इंडोवेस्टर्न साडी गाउन्स या लग्नाच्या सीझनमध्ये महिलांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. नवरा-नवरीच्या आजूबाजूला असणाऱ्या करवल्या आणि सख्यांच्या अंगावर असे पायघोळ गाउन्स जास्त पाहायला मिळत आहेत. कॉकटेल पार्टी यासाठी इंडियन साडी गाउन, अनारकली गाउनची निवड करतात. या समीकरणांमध्ये आपल्याला हवा तसा भारतीय पेहराव करावयास मिळतो. खास लग्नासाठी नेव्ही ब्लू, बरगंडी, मजिंटा, मरून या रंगांची अधिक चलती आहे. तसेच इतर वेळी गाउन्समध्ये पिच कलर, स्काय ब्लू कलर, यलो कलर अशा लाइट शेड्स चलतीत आहेत.

गाउनचे काही मुख्य प्रकार..

*बॉल गाउन- या प्रकारचा गाउन खांद्यापासून कमरेपर्यंत घट्ट असून त्याखाली संपूर्ण छत्रीच्या आकारासारखा फुललेला असतो. यामध्ये  ऑफ शोल्डर, स्ट्रीपलेस, मेगा स्लिवस् अशा प्रकारांमध्ये हे गाउन उपलब्ध आहेत.

*ए-लाईन- हे गाउन साधारण अनाकली ड्रेससारखे असतात. खांद्यापासून कमरेपर्यंत घट्ट त्याखाली साधारण घेर असलेला पायघोळ  गाउनला ‘ए-लाइन’ गाउन म्हणतात. सडपातळ मुलींना हा सर्वाधिक शोभून दिसतो.

*मर्मेड- परी कथेतील जलपरीचा पेहरावाप्रमाणे हा गाउन तयार करण्यात आला आहे. खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत घट्ट नंतर साधारण घोळ  पायाच्या मागच्या माजूला गालीचा अंथरल्याप्रमाणे कापड असते.

*या प्रकारांमध्ये थोडे फार बदल करून विविध रंगछटा वापरून असंख्य प्रकार सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

*कुठे-गावदेवी मार्केट, राममारुती रोड, कोरम मॉल, विविआना मॉल.

*किंमत- १००० ते ५०,०००

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:10 am

Web Title: indo western gown trapping in marriage
टॅग Marriage
Next Stories
1 रसरशीत मेदुवडे, कुरकरीत डोसे
2 मीरा रोड सोयीचे ठिकाण
3 नाताळोत्सव उत्साहात!
Just Now!
X